जुलैच्या ४/६ तारखेला तो सादर होण्याची शक्यता आहे. तो अर्थसंकल्प म्हणजे काय असतो, याचा हा आढावा.
एखादे व्यावसायिक आस्थापन असो वा सामाजिक संस्था वा देशाचे/राज्याचे सरकार असो, त्यांना वार्षिक जमाखर्च, ताळेबंद आणि अंदाजपत्रक हे काही चुकलेले नाही. कारण हे सर्व केल्याशिवाय प्रशासन वा व्यवस्थापन चालवणे कर्मकठीणच. त्यातून देशाचा अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे काही ये-यागबाळ्याचे काम नव्हे. त्यात आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतील विविध कंगो-यांचा विचार होत असल्याने, त्या-त्या क्षेत्रांतील बुजुर्ग मंडळींचे व्यासपीठ म्हणजेच देशाचे अर्थ मंत्रालय. देशाचा एकंदरीत कारभार साधारणत: नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉक या दिल्लीस्थित सरकारी कार्यालयीन संकुलातून चालतो. त्यातील नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थ मंत्रालय असल्याने तेथील उच्चाधिका-याचा भाव आणखीच असतो.
आता तुमच्या मराठी बाण्यानुसार तुम्ही विचाराल, यात मराठी अधिकारी किती आहेत? तर दोन हातांची बोटेसुद्धा जास्तच, असे दु:खाने म्हणावे लागेल. कारण आम्हाला मराठी लॉबी निर्माणच करता आलेली नाही. असो.
देशाच्या सर्वागीण/सर्वकष विकासाचा आणि आर्थिक घडामोडींचा विचार करणारे अर्थ मंत्रालय असल्याने बँकिंग, वाणिज्य, महसूल, विदेशी कर्ज, भारतीय मुद्रास्थिती अशा विविध भागांमध्ये विभागले आहे.
अर्थसंकल्प म्हणजे ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, येत्या आर्थिक वर्षात किती महसूल कोणत्या पद्धतीने उभा करणार आणि देशाच्या प्रत्येक रुपयाचा कोणत्या पद्धतीने व्यय केला जाईल, विकास प्रकल्प कसे राबवले जातील, देशवासीयांचे अंतर्गत व बाह्यशत्रूंपासून संरक्षणाकरिता किती खर्च होईल, विदेशी मुद्रा, बँकिंग प्रणाली या सर्वाबद्दलचा अभ्यास व त्यामुळे आम आदमीवर काय परिणाम होईल, याचा घेतलेला आढावा.
भारतीय राज्यघटनेच्या ११२व्या कलमान्वये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अंदाजित जमाखर्चाचे विवरण म्हणजेच अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ठेवले जाते. यालाच आपण बोलीभाषेत बजेट वा अर्थसंकल्प असे म्हणतो.
या अर्थसंकल्पाचे दोन भाग असतात ते असे :
१) जो खर्च की जो कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया (एकत्रिकृत निधी) या खात्यावर वर्ग केला जातो.
२) इतर खर्च विवरण जो एकत्रिकृत निधीला वर्ग होत नाही.
अर्थसंकल्पाचा अधिक तपशील जाणून घेण्यापूर्वी आपण अर्थसंकल्पाच्या इतिहासात थोडेसे डोकावू या. भारताच पहिला अर्थसंकल्प आर. के. षण्मुखम् चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला. त्यानंतर एकूण ७१ अर्थसंकल्प मांडले गेले. त्यांतील १२ हंगामी अर्थसंकल्प होते. साधारणत: ज्या आर्थिक वर्षात लोकसभेच्या निवडणुका असतात, त्या वर्षी निवडणुकीपर्यंतच्या खर्चासाठीची मान्यता हंगामी अर्थसंकल्पाद्वारे घ्यावी लागते व नवे सरकार आरूढ झाल्यावर आर्थिक वर्षातील बाकीच्या कालावधीचा मुख्य अर्थसंकल्प नवे अर्थमंत्री मांडतात. एकूण ७१ अर्थसंकल्पांपैकी सर्वाधिक १० अर्थसंकल्प मोरारजी देसाई यांनी मांडले. सर्वाधिक सलग सात वेळा अर्थसंकल्प मांडायचा मान सी. डी. देशमुख या अर्थतज्ज्ञ असलेल्या मराठी अर्थमंत्र्यास मिळाला. त्यांनी १९५१ ते १९५७ या काळात हे अर्थसंकल्प संसदेपुढे सादर केले. सध्याचे पंतप्रधान यांनी अर्थमंत्री असताना सलग सहा वेळा बजेट मांडले. त्यानंतरच्या पी. चिदंबरम यांनी एकूण सात वेळा अर्थसंकल्प मांडले, पण त्यातील पाच सलगपणे मांडले.
‘माणूस सवयीचा गुलाम असतो’ ही म्हण अर्थसंकल्पाबाबतही खरी ठरते ती अशी- गेल्या काही वर्षापर्यंत आपला अर्थसंकल्प संसदेत संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास मांडला जायचा. याच्या कारणमीमांसेमध्ये शिरल्यावर असे कळले की, पारतंत्र्यात असताना इंग्लंडचा अर्थसंकल्प दुपारी बाराच्या सुमारास मांडला जाई. नंतरच आम्ही मांडलिक म्हणून येथील अर्थसंकल्प आपण त्यांच्यापेक्षा पाच ते साडेपाच तास पुढे म्हणून संध्याकाळी मांडला जायचा, असा हा प्रघात. स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे आम्ही हे मांडलिकत्व का जोपासले, ते सवयीच्या गुलामीमुळे का? एक मात्र खरे की, नंतर अर्थसंकल्प दूरदर्शनवर ‘लाईव्ह’ दाखवायला लागल्यानंतर संध्याकाळचे उशिराने सन्मान्य सदस्यांचे झोपाळलेले व जांभया देणारे चेहरे जनतेला दिसायला लागल्यावर आपण सकाळी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली, असा निष्कर्ष काढायला लागतो.
अर्थसंकल्पातील जो भाग कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया (एकत्रिकृत निधी) मध्ये खर्च पडतो, तो सदनाच्या फक्त माहितीसाठी वा चर्चेसाठी ठेवला जातो. घटनेनुसार त्यावर कोणत्याही तऱ्हेचे मतदान घेण्याचा अधिकार संसदेला नाही वा त्यातील कोणताही खर्च कमी/जास्त करण्याचा अधिकार संसदेस नाही. या निधीमध्ये खाली तऱ्हेच्या खर्चाची विगतवारी असते :
१) राष्ट्रपतींना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी लागणारा सर्व खर्च.
२) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे वेतन/भत्ते.
३) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते, सेवानिवृत्तीचे वेतन.
४) राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते, सेवानिवृत्ती वेतन.
५) सरकारने काढलेल्या कर्जावरील भरावयास लागणारी किंमत/भार.
६) कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल (कॅग) हे देशाचे सरकारी लेखा व लेखापरीक्षण खात्याचे सर्वोच्च अधिकारी त्यांचे वेतन व भत्ते या वर्गातच येतात.
७) कोर्टाने दिलेल्या निकाल, डिक्री व अॅवॉर्डनुसार सरकार जी रक्कम देऊ लागते ती रक्कम.
८) घटनेनुसार किंवा संसदेने काही कायदा करून आणखी कोणतीही रक्कम यात वर्ग केल्यास ती रक्कम.
९) घटनेच्या २६६ व्या कलमानुसार सरकारने उभारलेली ट्रेझरी बिल्स वा अन्य स्वरूपात उभारलेली कर्जे वा त्याच्या परताव्यासाठी लागणा-या रकमा या सर्व एकत्रिकृत निधीमध्येच वर्ग होतात.
देशाच्या आर्थिक प्रणालीवर संसदेचे असलेले नियंत्रण हे घटनेच्या २६५ व्या कलमाखाली अधिक स्पष्ट केले आहे. या कलमानुसार कुठलेही महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी जर नव्याने करआकारणी करायची असेल, तर अथवा करप्रणालीमध्ये कोणतेही बदल करावयाचे असतील, तर त्यासाठी संसदेत त्याची मान्यता घेणे अनिवार्य आहे. आर्थिक सव्र्हेक्षण वा आढावा
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेपुढे दोन महत्त्वाचे दस्तऐवज ठेवले जातात, ते म्हणजे
१) आर्थिक सव्र्हेक्षण वा आढावा.
२) रेल्वे मंत्रालय.
मुख्य अर्थसंकल्प सर्वसाधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जातो. त्याआधी दोन दिवस रेल्वे अर्थसंकल्प व त्याही आधी दोन/चार दिवस आर्थिक सव्र्हेक्षण संसदेच्या पटलावर ठेवावे लागते. असे आर्थिक सव्र्हेक्षण सर्वप्रथम १९५८-५९ च्या अर्थसंकल्पाच्या वेळी मांडले गेले. त्यानंतर ते दरवर्षी सादर केले जात आहे.
अर्थसंकल्पाप्रमाणे आर्थिक आढावा/सव्र्हेक्षण (इकॉनॉमिक सव्र्हे) याचीही जबाबदारी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवरच असते. मंत्रालयीन अधिका-यांनी याबाबत केलेले मूलभूत काम व संशोधन हे प्राथमिक मसुद्याद्वारे मुख्य आर्थिक सल्लागार व आर्थिक व्यवहार खात्याचे (इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंट) यांच्या सचिवांकडे जाते. त्यातून आवश्यक ते बदल करून नवीन मसुदा अर्थ सचिव व अर्थमंत्र्यांसमोर सादर होतो. त्यांची संमती मिळाल्यानंतरच आर्थिक सव्र्हेक्षणाचा हा मसुदा संसदेत दाखल केला जातो.
या आर्थिक सव्र्हेक्षणात काय असते?
चालू वर्षातील देशातील आर्थिक परिस्थितीचा किंवा आर्थिक बाबींवर मोठा परिणाम घडवून आणणाऱ्या इतर बाबींबाबत घेतलेला आढावा असतो. सरकारी योजनांचे प्रतिबिंब जरी अर्थसंकल्पात दिसत असले, तरी आर्थिक सव्र्हेक्षण हा त्याचा पाया असतो. आर्थिक सव्र्हेक्षण नीटपणे वाचले की, असे लक्षात येते की, आगामी अर्थसंकल्पाची चाहूल त्यात लागते. सरकारचे आर्थिक सुधार व त्यावरील कार्यक्रमाचे शब्दांकन अर्थमंत्र्यांना या सव्र्हेक्षणातून देता येते. यात पुढील बाबींचा समावेश असतो. मागील अर्थसंकल्पामध्ये काय ठरवले होते व प्रत्यक्षात काय घडले, याचा थोडक्यात आढावा. त्यात खाली बाबींचा विशेष समावेश असतो :
१) अर्थव्यवस्थेची सामान्य समीक्षा : यामध्ये राष्ट्रीय उत्पादन, उपभोग, गुंतवणूक, बचत, विकास दर, मानव विकास, बेरोजगारी यांची परिस्थिती नमूद केलेली असते.
२) चलन व बँकिंग : नाणेविषयक घटना व कल, नाणेविषयक धोरण, बँकिंगचे धोरण, बँकांची कर्जे, कृषी वित्तीय, बिगर वित्तीय संस्थांचा अहवाल. देशातील व जगतातील एकंदरीत मंदीचे वातावरण, परदेशांत असलेल्या बँकांच्या परिस्थितीला अनुसरून आपल्या येथील भारतीय बँकांची परिस्थिती याचा आढावा येत्या सव्र्हेक्षणात असायला हवा.
३) बँकांच्या परिस्थितीला अनुसरून आपल्या येथील भारतीय बँकांची परिस्थिती याचा आढावा येत्या सव्र्हेक्षणात असायला हवा.
४) रोखे बाजार : प्राथमिक, दुय्यम व वस्तूंचा (कमोडिटी मार्केट) याबाबत सरकारचा धोरणात्मक बदल वा दृष्टिकोन याचे प्रतिबिंब गेल्या वर्षभरात सेन्सेक्सचे जे खाली/वर उडय़ा मारणे चालू आहे, त्याचा उल्लेख यात यायला हवा.
४) सार्वजनिक वित्त व्यवहार : कर, कर्जे, व्याज, अनुदाने यांचा राजकोषावरील परिणाम, राज्यस्तरावरील सुधारणा.
५) विदेश व्यापारातील विदेश व्यापार, गुंतवणूक, विनियम दर, विदेशी चलनसाठा वगैरे मुद्दय़ांवर आढावा घेतला जातो.
६) किमती व अन्नधान्य व्यवस्थापन : भाववाढ, किंमत निर्देशांक, शासकीय अन्नधान्य खरेदीविषयक अहवाल. त्यावरील अनुदान, भाववाढविरोधी उपाययोजना वा धोरण. या वेळी देशभरात गरीबांना ३ रुपये किलोने धान्य देण्याचे काँग्रेस पक्षोन आश्वासन दिले होते. त्या दृष्टिकोनातून यात भाष्य असायला हवे.
७) उद्योग, गुंतवणूक, विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, आजारी उद्योग, कामगार संबंध, सेझबाबतचे धोरण याचा ढोबळ समावेश यात व्हावा.
८) शेती उत्पादन व शेती पूरक अन्य उत्पादने म्हणजे फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, बी-बियाणे, कृषी कर्जे, खतोत्पादन या निगडित बाबी. गेल्या वर्षी कृषी कर्जे माफ केली होती, त्याचा आढावा यात हवा. त्याचप्रमाणे मत्स्योत्पादनाचा दुष्काळ याही विषयाचा समावेश होऊ शकतो.
९) पायाभूत सुविधा : रस्ते, वीज, बंदरे, हवाई वाहतूक, रेल्वे, नागरी सुविधा, दूरध्वनी वगैरे बाबी.
१०) सामाजिक क्षेत्र : रोजगारनिर्मिती योजना, लोकसंख्या, महिला सबलीकरण, बालविकास, ग्रामीण पाणी व सांडपाणी व्यवस्था, अल्पसंख्याक व अनुसूचित जाती-जमातींविषयी भाष्य, महिला बचत गटांबाबत भाष्य यात येईल.
या भाष्यांखेरीज सांख्यिक विवरणेही बोलकी असतात. आज महाराष्ट्रातील जनता चातकाप्रमाणे दोन गोष्टींची वाट पाहत आहे, एक पावसाची आणि बजेटची. बघू या दोन्ही गोष्टी जनतेवर अनुकूलरीत्या बरसतात काय?
http://www.prahaar.in