Wednesday, June 17, 2009

सर्वव्यापी


अभिजीत देसाई

नाटय़सृष्टीतील कोणत्याही खेळात विजय केंकरेचा सहभाग असू शकतो. नाटय़सृष्टी हाच त्याचा ‘कंपू.’ नाटय़शास्त्रावर तो जितकं अभ्यासपूर्ण बोलतो, तितक्याच दिलखुलासपणे तो ‘कॉफी विथ आइस्क्रीम’ची मजा घेतो. विजय सर्वव्यापी, सर्वसंचारी आहे. विजय केंकरे अजातशत्रू मानला जातो. विजयचं जिवलग मित्रमंडळ नाटय़क्षेत्रात ‘कंपूशाही’चा आरोप पत्करूनही सदैव ‘एकामेका’धरून व्यवसाय करू देत त्यांचा म्होरक्या विजय मात्र सर्वव्यापी, सर्वसंचारी आहे.
तो घटकेत संतोष पवारच्या ग्रूपमध्ये दिसू शकतो. घटकेत वामन केंद्रेच्या ‘एनएसडी’मध्ये नाटय़शास्त्रावर झक्क भाषण ठोकू शकतो किंवा मग अरुण नलावडे दिग्दर्शित नाटकात छोटी भूमिका करू शकतो. इतकंच नव्हे तर त्याच नाटकात सहकलाकाराच्या अपरिहार्य अनुपस्थितीत प्रयोग रद्द होऊ नये म्हणून महत्त्वाच्या भूमिकेत ‘रिप्लेसमेंट’ उभा राहू शकतो. ऐन वेळेला भूमिका निभावून निर्मात्याला प्रचंड नुकसानीतून वाचवणं या सद्हेतूसमोर भीतीसारखे शब्द फार थिटे ठरतात.
नाटय़निर्मात्याच्या मदतीला धावून येण्याची प्रमुख भूमिका विजय वर्षानुवर्ष इमानेइतबारे वठवत आला आहे. एरवी ‘कार्टी प्रेमात पडली’पासून ‘मित्र’पर्यंत आणि ‘नकळत सारे घडले’पासून ‘सारखं छातीत दुखतंय’पर्यंत त्याच्या दिग्दर्शित नाटकांची ‘रेंज’, त्याचप्रमाणे यशस्वी नाटकं दिग्दर्शित करण्याचं सातत्य पाहता आज छोटय़ा भूमिकेत त्याने रंगमंचावर दिसण्याची आवश्यकता नाही. रंगभूमीवरील आघाडीचा दिग्दर्शक नुसतीच ‘रिप्लेसमेंट’ची भूमिका करतोय किंवा दोन अंकामधील ‘अनाउन्समेंट’ त्याच्या आवाजात रेकॉर्ड झालीय, हे कोडं सोडवायला कठीण जातं.‘‘काही कठीण नाही. मला बोलावतात मी जातो. या अर्थी मला इगोबिगो काही नाही.’’
‘दही बटाटा पुरी’ किंवा ‘दम आलू काश्मिरी’ एका दमात फस्त करावी इतक्या सहजतेने विजय सांगतो.
‘‘मी लहानपणापासून असाच आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्याला लोकांनी वाईट माणूस म्हणून नये, अशी एक इच्छा खूप वर्षापूर्वी माझ्या मनात निर्माण झाली. कदाचित माझ्या मनाविरुद्ध जाऊनही मी काही लोकांना मदत करतो. कुणी माझा फायदा करून घेतलाय वगैरे मला अजिबात वाटत नाही. मधल्या काळात मी माझ्या प्रशिक्षणासाठी दुस-या दिग्दर्शकांच्या हाताखाली छोटय़ा-मोठय़ाभूमिका केल्या. ठराविक एखादा विषय त्यांना कोणत्या अँगलने मांडावासा वाटतो, हा माझा वैयक्तिक अभ्यासाचा भाग होता; पण एक ‘क्रेव्हिंग’ म्हण्तो नं- लोकांनी आपल्याला वाईट म्हणू नये हे माझ्या वृत्तीत निश्चित आहे. त्याकरिता मी प्रसंगी मागेसुद्धा हटलोय. माझ्या मतांच्या संदर्भात मात्र मी वेगळा आणि ठाम आहे. मी बिलकूलच हिंदुत्वनिष्ठ वगैरे नाही. मी निरीश्वरवादी आहे. याबाबतीत मला कुणी सांगितलं की, माझ्याबरोबर देवळात चल, तर मी ठामपणे येणार नाही. तुमच्या जाण्याला माझ्या विरोध नाही. तुम्ही जरूर जा. मला बोलावू नका. अशासारख्या काही गोष्टी मला कमालीच्या आग्रही करून सोडतात. काही तरुणांमध्ये एक फॅशन आहे- महात्मा गांधींवर टीका करतात. मी काही गांधीवादी नाही; पण गांधी मूर्ख होते म्हणण्यापर्यंत जर तुमची मजल जाते, तर मूर्खानो, तुम्ही किती गांधी वाचलाय? मग मी त्यांच्यापुढे इंग्लिश-मराठीतल्या गांधी साहित्यातले उतारेच्या उतारे वाचून दाखवू शकतो.’’ ‘मेक-व्हेजी पिझ्झा विथ चीज मशरूम टॉपिंग’ चा तुकडा तोडावा तसा विजयचा पापड मोडतो. नाटय़पोषक वातावरणात वाढलेल्या विजयला एके काळी चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचं होतं आणि जोडीला अर्थातच क्रिकेट खेळण्याची इच्छा होती; पण आई-वडील, मावशी सगळेच नाटय़क्षेत्रात..
‘‘आजोबा तात्या आमोणकर मुंबई साहित्य संघाच्या कमिटीवर होते.’’ विजय प्रश्न तोडत उत्तर देऊ लागतो.
‘‘साहित्य संघ हे दुसरं घर होतं. हाजीअलीला सरकारी क्वॉर्टर्समध्ये राहायचो. शाळा दादरला बालमोहन विद्यामंदिर. संघात जाऊन संगीत किंवा गद्य नाटक बघण्याचे संस्कार अगदी लहानपणापासून झाले. रविवारचा सकाळचा प्रयोग अगदी ‘ओव्हरपॅक्ड.’ मग संघातला वडा खायचा. प्रमोद नवलकर प्रेमाने ‘कॅडबरी’ देणार. सगळं रीतसर ठरलेलं. हाजीअली सोडून कलानगरमध्ये राहायला आलो तरी वातावरण कायम राहिलं. उलट त्यात वाढ झाली. विजयाबाई, पुलंसारखी मंडळी बाबांशी बोलायला घरी येत होती. माधव वाटवे दर शनिवारी आमच्या घरी असत. शेजारी अरुण नाईक- राजीव नाईकचं घर. तिथे नाटकातली माणसं कमी; पण साहित्यातली मातब्बर मंडळी येत.
संस्कार कळत-नकळत घडत गेले. एका टप्प्यावर अपघात झाला. विजय गोखले आणि अमृत दामले म्हणजे प्रशांत दामलेचा भाऊ, यांनी एका इंटरकॉलेजिएट एकांकिकेत मला रंगमंचावर पाठवलं आणि माझं ते काम धाडकन आपटलं. पाल्र्यात नवीनभाई ठक्कर हॉलमध्ये ‘उन्मेष’ची स्पर्धा होती आणि आमचं नाटक त्यात ‘हुटआऊट’ झालं ते माझ्यामुळे. माझ्या नाटकातल्या कॅरॅक्टरच्या नावाने मीच समोरच्या पात्राला हाक मारली. माझं नाटकातलं नाव अन्वर होतं. मी समोरच्या पात्राला प्रश्न केला ‘क्यो अन्वर कैसे हो?’ एकांकिका पडली. पुढच्या वर्षी १९७८ साली आम्ही दिवाळीत- माझे आजोबा-आजी-तात्या राहत त्या गिरगावच्या मॉडेल हाऊसमध्ये नाटक केलं होतं. ‘सौजन्याची ऐशी तैशी.’ लक्ष्मीकांत बेर्डेने ते पाहिलं. तो म्हणाला, ‘विजय तू काम कर. माझा भाऊ पुरुषोत्तम बेर्डे नाटक बसवतोय.’ १९७९ मध्ये ‘देवस्की’मध्ये प्रथम काम केलं. घरी बाबांशी नाटय़विषयक चर्चा वगैरे घडतच होत्या.
हळूहळू माझ्या असं लक्षात येऊ लागलं की, माझ्यात ‘अ‍ॅक्टर्स ब्रेन’ नाही. माझं सतत इतर गोष्टींकडे लक्ष असे. समोरचं पात्रं काय करतंय? लाइट कुठून येतोय? निरीश्वरवादाबद्दल बोलणारं नाटक आहे, मग देवाला नमस्कार केला तर चालतो, अशा पद्धतीचं वाक्य का येतंय? माझी संहितेत लुडबूड. एखाद्या पात्राचा सुर चुकीचा लागतोय म्हणून लुडबूड. कधी कधी मी, प्रदीप मुळय़े, सुहिता थत्ते आमच्यात घनघोर चर्चा होत. तिथे माझ्या लक्षात आलं की, नटाचा म्हणून जो विचार असतो, तो मला करताच येत नाही. मला स्पष्ट वाक्यं बोलता येतात. त्यालाच अभिनय समजायची आपली पद्धत असल्याने त्या नाटकापुरता मी तरून गेलो. (पॉझ) आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं पाठांतर खूप छान आहे.’’ (मिश्कीलपणे डोळे मिचकतो.) विजय थांबतो. त्याच्या ‘टेरेस’ फ्लॅटमध्ये भला मोठा ‘ट्रेडमिल’ पसरलाय. विजय ‘ट्रेडमिल’वर धावू लागतो. थोडय़ा वेळाने घामाने निथळत कॉफीचा ‘मघ’ हातात घेऊन
ही कन्टिन्यूज. ‘‘‘देवस्की’मध्ये असिस्टंट डायरेक्टर असल्याप्रमाणे काम करू लागलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘नानासाहेब फाटक एकांकिका स्पर्धेत’ पुरुषोत्तम बेर्डेने मला रघुवीर कुलची ‘इजा बिजा तिजा’ स्वतंत्रपणे दिग्दर्शित करण्याची संधी दिली. गुरू नेहमी शिष्याचा हात पकडून ठेवतो. ‘देवस्की’सारखं एक नाटक, त्याबरोबर स्वतंत्र एकांकिकेची संधी आणि माझा हातच सोडून दिला. पुरुषोत्तम बेर्डेला मी याचं पूर्ण क्रेडिट देतो. आपल्या शिष्याचा हात कधी सोडायचा, हे गुरूला कळायला हवं. त्याने माझा हात वेळीच सोडल्याने योग्य वेळी माझा नाटय़प्रवास सुरू झाला.’’
एकांकिका- हौशी प्रेक्षक, रंगकर्मी सगळं छान छान कौतुकाचं, पण व्यावसायिक रंगमंच म्हणजे तिकीट काढून येणारा प्रेक्षक. इथे लिंबूटिंबू काहीही नाही.
‘‘राज्य नाटय़स्पर्धेचं प्रमाण त्या काळात अधिक होतं. टीव्ही नव्हता. तेव्हा छबिलदासचं नाटक हा प्रशिक्षणाचा भाग असे. राज्य नाटय़स्पर्धेत मी ‘ऑथेल्लो’ केलं, ज्याचा ‘स्केल’ असाच व्यावसायिक नाटकाइतका प्रचंड होता. सहा महिन्यांचं वर्कशॉप प्रॉडक्शनसारखं आम्ही केलं. आम्ही सहा महिन्यांत केवळ ‘हौशी’ राहिलो नव्हतो, तर ‘आंतरनाटय़’ नावाची आमची संस्था अस्तित्वात आली. ‘भाषांतर-रूपांतरमधलं अंतर.’ त्यातला जो नटसंच होता- संजय मोने, तुषार दळवी, रेणुका शहाणे, सुमुखी पेंडसे, राकेश सारंग या सगळय़ांनी पुढे जाऊन व्यावसायिक थिएटर केलं. वर्कशॉपचा फायदा सगळय़ांना झाला.
मी जेव्हा पहिलं व्यावसायिक नाटक केलं शं. गो. साठेंचं ‘ससा आणि कासव’, तेव्हा मी शिक्षित होऊन व्यवसायात उतरलो होतो. व्यावसायिक रंगमंच म्हणजे छोटय़ा-मोठय़ा तडजोडी आल्याच. ‘आंतरनाटय़’मध्ये आम्हाला वाटतं ते करायचं, पण व्यावसायिक नाटकात आपण एका दुस-या माणसाच्या (निर्मात्याच्या) दोन लाखांवर नाटक करतोय याची जाणीव कायम ठेवावी. माझे तीन-चार माणसांशी व्यावसायिक संबंध कायम आहेत. निर्माता म्हणून सुधीर भट, मोहन वाघ किंवा ‘गोवा हिंदू असोसिएशन.’ रत्नाकर मतकरींची चौदा नाटकं केली. सुधीरबरोबर तीस-बत्तीस, अशोक पत्कींनी माझ्या बत्तीस-पस्तीस नाटकांना संगीत दिलं. या सर्व निश्चितच तडजोडी नव्हत्या. एक टय़ुनिंग तयार झालंय. आणि ही सगळी मंडळी विलक्षण ‘पॅशन’ने नाटक करतात. आज ‘चंद्रलेखा’ किंवा ‘सुयोग’चं नाटक म्हणून लोक येतात. तेव्हा तिथे एक बेसिक दर्जा सांभाळला जातोच’’
.. आणि व्यावसायिक मंचावरची स्टार कंपनी?
‘‘नाटक ही गोष्टच ‘डेमोक्रॅटिक’ आहे. एकसंध परिणाम दर्शवणं हा दिग्दर्शकाचा प्रांत असला, तरी ‘मीच आता दिग्दर्शक’ ही वृत्ती नाटकाला घातक ठरू शकते. समोरून येणा-या सूचना एकत्रित परिणामाला हातभार लावू शकतात. उदाहरण देतो. नट विक्रम गोखले. नाटक ‘नकळत सारे घडले.’ गोखलेंच्या ‘पॉझ’ किंवा ‘विराम’चा ब-याच वेळा चुकीचा अर्थ घेतला जातो. नाटकातला सीन, अडीच पानांचा. एका प्रवेशात अडीच पानांची गोखलेंनी पाच-सहा वाक्यं केली आणि बॉडी लँग्वेजमधून ते इतकं बोलले की, सीनचा अचूक परिणाम साधला गेला. मी म्हटलं, ‘गोखले हेच करा यापुढे.’ आणि त्यांनी हे तालमीला केलं नव्हतं, तर डायरेक्ट प्रयोगात केलं होतं. मी नेमका त्या प्रयोगाला गेलो होतो. तालमी दरम्यान एके दिवशी गोखलेंनी मिटिंग घेतली. म्हणाले, ‘विजय केंकरेला मी दिग्दर्शक म्हणून मान्य केला नव्हता, पण आज पहिला अंक बसवून झाल्यावर माझी खात्री पटलीय की, ती माझी चूक होती. मी सगळय़ांच्या देखत विजयची माफी मागतो.’ म्हणजे स्टार कितीही मोठा असो, दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे convincing power असेल, तर तो नट convince होतो. याची बॅकग्राऊंड अशी होती की, गोखलेंना कुणी तरी सांगितलं होतं की, ‘विजय, म्हणजे मी असं म्हणालो की, ‘नकळत सारे घडले’ हे विनोदी नाटक आहे.’ त्यांनी काय केलं, माझ्याकडे नाटक होतं, तेव्हा ते विजय मेहतांना वाचायला दिलं. विजयाबाईंनी अर्थातच नकार दिल्याने ते माझ्याकडेच राहिलं. पण पहिला अंक बसल्यावर त्यांनी जाहीर कबुली देण्याचा मोठेपणा दाखवला.
दुसरं उदाहरण देतो. नट डॉक्टर श्रीराम लागू. नाटक ‘सुंदर मी होणार.’ त्या काळात डॉक्टर लागू कमालीचे तजेलदार दिसत. त्यांची नाटकातली डॉक्टर पटवर्धनची व्यक्तिरेखा साधी, डी-ग्लॅमराइज्ड. मी डॉक्टरांना म्हटलं, ‘तुम्ही कधीही गळय़ातला टाय काढू नका. आपण ठरवलंय तसाच तो गबाळय़ा अवस्थेत गळय़ात लटकू दे. टाय काढलात, तर नुसत्या शर्ट आणि कोटमध्ये तुम्ही फार स्मार्ट दिसाल.’
बारामतीच्या एका प्रयोगात त्यांनी टाय वापरला नाही. दुस-या दिवशी पुण्यात प्रयोग. मी सहज गेलो. त्यांनी मला बाजूला नेऊन सांगितलं, ‘काल मी टाय न लावता तिस-या अंकात एंट्री घेतली आणि एक्झिट घेतल्यावर आरशात पाहिलं, तेव्हा मला तुझं म्हणणं पटलं. अरे मी भलताच स्मार्ट दिसतो. काल तुझी परवानगी न घेता टाय काढला म्हणून सॉरी. यापुढे तसं होणार नाही.’ म्हणजे या माणसांना पक्की चौकट आखून दिली, तर ती माणसं स्वीकारतात. हाच अनुभव भक्ती बर्वेचा, हाच अनुभव अशोक सराफचा. नाटक- ‘सारखं छातीत दुखतंय.’ त्याला भूमिकेत वेडे वेडे चाळे करता येतील, पण तो करत नाही. असा अशोक बघायची प्रेक्षकांना सवय नाही. पण ती अशोकने लावलीय आणि नाटक उत्तम चाललंय. अशोकने सुरुवातीलाच मला सांगितलं होतं, ‘जास्त कुठे होत असल्यास मला सांग. आपण त्या क्षणी ते कमी करू.’ दिलीप प्रभावळकरांविषयी बोलायचीच आवश्यकता नाही. प्रशांत दामलेला ‘आम्ही दोघं राजराणी’ करताना प्रचंड त्रास झाला. पण त्याने जिद्दीने वेगळी भूमिका करून दाखवली.
सुप्रिया पिळगावकर, नाटक पुन्हा ‘आम्ही दोघं राजा राणी।’ तालमीच्या पहिल्याच दिवशी तिने स्क्रीप्टच उचललं नव्हतं. अख्खं नाटक ती घरून पाठ करून आली होती. वेशांतराच्या सीनला स्वत:च्या इमेजपासून दूर जाणा-या गोष्टी तिने लीलया केल्या. या पद्धतीचा विचार खूप नट करतात आणि त्यांना जर बांधून ठेवलं, तर मग दिग्दर्शक म्हणून मी या गोष्टींना मुकतो. त्यांनाही स्वत:ला सिद्ध करायचं असतं. ‘मित्र’ मध्ये किंचित ‘हायस्पीच’ बोलायचं. कारण तो तर्कटी म्हातारा आहे, हे डॉक्टर लागूंना वेगळं सांगण्याची गरज नव्हती. मुळात वाचनातूनच त्यांना सूर सापडला होता. बाबांना (दामू केंकरे) जेव्हा मी ‘हा तेरावा’मध्ये दिग्दर्शित केलं, तेव्हा मला टेन्शन आलं होतं. पण ही मंडळी आधीच खूप विचार करून आलेली असतात, हे मी अनुभवाने सांगू शकतो.’’ विजय ‘टू द पॉइंट’ बोलतो. मुद्दा मांडताना त्याचे हातवारे आणि ‘स्पीच’मधलं व्हेरिएशन दिग्दर्शकाप्रमाणे कमी आणि अभिनेत्याप्रमाणे अधिक असल्याचं जाणवतं. यावरून अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही डगरींवर त्याने सतत पाय ठेवण्याचा पराक्रम करायला हरकत नाही. शेव बटाटापुरी खाऊन ‘ट्रेडमिल’वर चालण्याची कसरत तो लीलया करतोच आहे की!


No comments:

Post a Comment