
सेटवर पहिला सीन हा कधी इमोशनल असतो, दुसरा अॅक्शन असतो, तिस-यामध्ये मला काही तरी विनोदी करायचं असतं। दिवसभर मी भावनांशी एका परीने खेळतच असतो.
मी रोज सकाळी साडेसहा वाजता उठतो. साडेसातला नित्यकर्म आटोपून जिममध्ये जातो. तिथे तासभर वर्कआऊट करतो. हा असा दररोज सक्तीनं व्यायाम करणं मला आवडत नाही. तरी मला ते करावंच लागतं. तिथेच सोना वगैरे घेऊन घरी येऊन आंघोळ-पांघोळ करून मी साडेनऊ वाजेपर्यंत सेटवर जातो. सेटवर गेल्या-गेल्या कामाला सुरुवात करतो. सेटवर पहिला सीन हा कधी इमोशनल असतो, दुसरा अॅक्शन असतो, तिस-यामध्ये मला काही तरी विनोदी करायचं असतं. दिवसभर मी भावनांशी एका परीने खेळतच असतो. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एकाच दिवसात इतक्या भावना कधी येत नसाव्यात. इथे तर प्रत्येक तासागणिक भावना बदलतात. या सततच्या भावनिक आंदोलनाचा एक प्रचंड ताण मनावर, बुद्धीवर आपल्या स्वत:च्या भावनांवर येतो. हा ताण एका वेगळ्याच स्वरूपाचा असतो.
त्यानंतर साधारण रात्री दहाच्या सुमारास शूटिंग संपते. त्यानंतर माझ्या काही महत्त्वाच्या मीटिंग्ज असतात. काही चर्चा, विचारविनिमय, मित्राला भेटणं, या सा-या गोष्टींसाठी माझ्याकडे रात्रीचीच वेळ असते. मग त्यात बारा- साडेबारा होतात. या मीटिंग्जच्या दरम्यानच मी माझं जेवण उरकतो. मग घरी येणं, आंघोळ, झोपणं, पुन्हा सकाळी साडेसहाला उठणं.. बरं ही अशी मस्त दिनचर्या ठेवून तुम्हाला कायम फ्रेश दिसावं लागतं. तुमचा चेहरा असा असला पाहिजे की, तुम्ही आताच काश्मीरला जाऊन आलेला आहात. तुम्ही फार ऐषारामात जगत आहात हे तुमच्या चेह-यावर दिसावंच लागतं. हे सगळं एक कलाकार कशासाठी करतो, तर या सा-यातून एक व्यावसायिक यशही आणावं लागतं. जोपर्यंत तुम्ही चांगलं काम करत आहात तोपर्यंत लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील. अन्यथा तुम्हावा लागलीच बाजूला टाकलं जाऊ शकतं. आपल्या देशात अनेक धर्म असले तरी दोन मुख्य धर्म आपल्याकडे आहेत, असं मला वाटतं. एक क्रिकेट आणि दुसरा फिल्म, टी.व्ही. किंवा ज्याला आपण मीडिया म्हणतो तो. या दोन क्षेत्रांतल्या लोकांना जी प्रसिद्धी, ज्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद मिळतो, तो इतर कुणाला मिळत असेल असं मला वाटत नाही. आपल्याला भेटायला, पाहायला आपली स्वाक्षरी घ्यायला जी माणसं येतात, ज्या प्रकारचं प्रेम आपल्यावर करतात, जो मानसन्मान देतात, ती एक प्रकारची जबाबदारी असते. ते आपल्यासाठी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढतात. त्यांच्या या प्रेमाची जबाबदारीही एक अभिनेता म्हणून मला फार मोठी वाटते. या सगळ्यात दगदग, ताणतणाव, सततचं काम या सगळ्यांमध्ये तुम्हाला एखादी चांगली दाद मिळाली, कौतुकाचा एखादा एसएमएस कुणी केला, तर या सगळ्या कामांचा शीण कुठच्या कुठे पळून जातो. हे सगळं अनुभवण्याची एक मजा असते. एक झिंग असते. हे कौतुक आपल्याला दुस-या दिवशी उठवतं. पुन्हा नव्या उमेदीनं.
मी स्वत:ला फार नशीबवान समजतो की, मी एक कलाकार आहे. मी यासाठीही नशीबवान आहे की मला आयुष्यात तेच करायला मिळालं, जे मला करायचं होतं. माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं, प्रेक्षकांनी प्रेम दिलं, मला चांगल्या दिग्दर्शक आणि सहकलाकारांची, माध्यमांची साथ मिळाली. भावनांचं आंदोलन झेलण्याची तयारी असेल तर अभिनय हे एक ग्रेट प्रोफेशन आहे, असं मी समजतो. मी कॉमेडी सर्कसमध्ये चंपा चंपेली हा विनोदी भाग केला, त्या दिवशी माझ्या आईला हार्टअॅटॅक आला होता. शूटिंग पुढे ढकलणं शक्य नव्हतं. मी एका बाजूला विनोद करत होतो. माझं मन मात्र हॉस्पिटलमध्ये असलेल्या माझ्या आईच्या पलंगाजवळ होतं. ती ठणठणीत बरी झाली. माझा तो भाग गाजला. पण त्या दिवशी मी जे केलं ते माझं मलाच ठाऊक. केवळ एका अभिनेत्याच्या आयुष्यातच असे प्रसंग येऊ शकतात।http://www.prahaar.in
No comments:
Post a Comment