Tuesday, June 9, 2009

तेरा क्या होगा कालिया?

वैभव वझे

केवळ आवड म्हणून, कुतूहल म्हणून किंवा जिद्द म्हणून- अशा अनेक कारणांनी लोक चित्रपट हे माध्यम चोखाळतात. कुतूहलापोटी या मायानगरीत दाखल होऊन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेला कलावंत म्हणजे विजू खोटे.
केवळ आवड म्हणून, कुतूहल म्हणून किंवा जिद्द म्हणून- अशा अनेक कारणांनी लोक चित्रपट हे माध्यम चोखाळतात. कुतूहलापोटी या मायानगरीत दाखल होऊन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेला कलावंत म्हणजे विजू खोटे. उंचपुरे व्यक्तिमत्त्व, कमावलेलं शरीर, दुस-याला जरबेत घेणारा खर्जातला आवाज, पंचकोनी चेहरा असं काहीसं त्यांचं वर्णन करता येईल. प्रथमदर्शनी पाहणा-याला त्यांच्यात आणि शुभा खोटे यांच्या चेहरेपट्टीतलं साम्य लक्षात येतं. ही दोन्ही भावंडं चित्रपटसृष्टीत आपलं वेगळेपण राखून आहेत.
विजूदांनी (विजू खोटे) अभिनय करताना विनोदाला दूर केलेलं नाही. त्याच वेळी खलनायकाचा ‘राइट हँड’ म्हणून विशेष ओळख निर्माण करण्यातही ते यशस्वी झाले आहेत. विजूदा चित्रपटात वावरत असताना त्यांना दुय्यम भूमिका मिळत असल्या तरी इंग्रजी रंगभूमीवर ते प्रमुख भूमिका साकारत आहेत. म्हणूनच त्यांच्याशी गप्पा मारताना या इंग्रजी रंगभूमीपासून सुरुवात केली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाच्या ‘फनी थिंग कॉल लव्ह’ या इंग्रजी रूपांतरात विजूदा काम करत आहेत. असं रूपांतरित नाटकात काम करताना मूळ नाटक पाहायला हवं, असं मात्र त्यांना कधी वाटत नाही. उलट त्यामुळे नट गोंधळून जातो, असं त्यांनी सांगितलं.
‘‘मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, मूळ नाटक पाहायचंच असेल तर ते लेखकानं पाहावं. त्याला मूळ नाटकाचं आपण रूपांतरण करतोय, हे भान कायम ठेवण्यासाठी याची जरूर भासते. कलावंतानं पाहायला हरकत नाही. पण त्यामुळे तोटा एकच होतो, तुम्ही त्या मूळ नाटकातल्या परफॉर्मन्सशी बांधले जाता आणि तुमची त्या भूमिकेकडे पाहण्याची शक्ती हरवून जाते. यू ट्राय टू डू व्हॉट दे हॅव डन इन द ओरिजनल. रमेश देव करायचा तेव्हा कधी तरी मी ‘प्रेमा तुझा.’ पाहिलं असेल. १९६२चं ते नाटक आहे. आता आम्ही भारताबाहेर त्याचे इंग्रजी प्रयोग करतो, त्यांना आजही तुफान प्रतिसाद मिळतो. ही त्या मूळ नाटकाचीच पुण्याई म्हणायला हवी.’’
विजूदांनी या नाटकाचे प्रयोग इंग्लंडमध्येही केलेत. इंग्लंडच्या प्रथेनुसार कोणत्याही नाटकाचा प्रयोग झाला की प्रेक्षकांना ‘बाय बाय’ करण्यासाठी सगळे कलावंत दरवाजाशी येऊन उभे राहतात. त्यामुळे कलावंतांशी प्रत्येक प्रेक्षकाला थेट संवाद साधता येतो. हा प्रसंग विजूदांना खूप काही शिकवून गेला. सातत्याने नाटकं पाहणा-या प्रेक्षकांकडून मौलिक सूचनाही मिळत गेल्या, तसतसा सगळ्या चमूचा परफॉर्मन्स सुधारत गेला.
‘‘नुसतं नाटक सुधारतं असं नाही तर आम्हाला थेट प्रतिक्रियांचा आनंद घेता येतो. एका मुलीनं मला सांगितलं होतं, यूनो यू आर लाइक माय फादर! ही ऑलवेज डू सम फनी अँड स्टुपिड थिंग्ज अ‍ॅट द राँग टाइम! या नाटकाला देशातही असाच प्रतिसाद मिळतो आणि विशेष म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हे नाटक पाहायला येतो. म्हणजे पाहा, १९६२ सालच्या नाटकाला आज २००९मध्येही प्रेक्षक मिळतोय!’’
मराठी रंगभूमीचा संहितात्मक विकास पूर्ण झाला असला तरी रंगमंचीय सादरीकरणाच्या बाबतीत आपण पाश्चात्त्यांच्या वा-यालाही उभे राहू शकत नाही, ही खंत विजूदांनी बोलून दाखवली. पाश्चात्त्य रंगमंचाचे आकार दोन मजली असतात आणि त्यावर खरोखरच दोन मजली सेट लावता येतो. ‘फँटम ऑफ द ऑपेरा’मध्ये वरून खाली येणा-या गोलाकार पाय-यांचा जिना दाखवलाय. माणसं संवाद म्हणत त्या जिन्यावरून वर जातात आणि वरच्या विंगेत गायब होतात! या भव्यतेला तिथले लेखक गृहीत धरत नाहीत, तर ते स्क्रिप्टवर तितकीच मेहनत घेतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षक फार महत्त्वाचा असतो.
‘‘होय, तिकडे प्रेक्षक नाटकावर जीवापाड, खरं तर पैशाने प्रेम करतो! म्हणजे कसं, महागडं तिकीट लावलं तरी प्रेक्षक मोठ्या संख्येनं येतो. त्यामुळे नाटक कंपनीला नवीन काही करण्यासाठी हाताशी पैसा मिळतो. आपल्याकडे एखाद्या मराठी नाटकाचं तिकीट १०० रुपये लावा, लगेच बोंबाबोंब सुरू होईल. सध्या ‘अल्केमिस्ट’सारखं इंग्रजी नाटक सुरू आहे. अशा नाटकांना ५०० रुपये तिकीट लावल्यावाचून खर्च भागत नाही. इतकं तिकीट खरेदी करून नाटकाला प्रेक्षक येत नाही. हे असं विचित्र त्रांगडं होऊन बसलंय. वी शूड सपोर्ट अवर स्टेज.’’
विजूदांचे वडील नंदू खोटे हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला नट तसंच दिग्दर्शक म्हणून परिचित होते. ‘या मालक’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आजही आपल्या स्मरणात आहे. विजूदांना अभिनयाचं बाळकडू वडिलांकडूनच मिळालं. विजूदांचे मामादेखील याच व्यवसायात होते. घरच्यांना त्यांनी वकिली करावी, असं मनापासून वाटत होतं. काही काळ त्यांनी प्रिटिंग प्रेस चालवला. त्यात मन रमेना. शेवटी विजूदांनी अभिनयाचं अ‍ॅक्टिंग निवडलं. १९६९च्या सुमाराचा ‘सच्चा झूठा’ हा विजूदांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी गँगस्टर साकारला होता.
‘‘१९६९मध्ये अभिनय हाच व्यवसाय म्हणून निवडल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे सिनेआर्टिस्ट असोसिएशनचं सदस्यत्व घेतलं, त्याला कार्ड काढलं, असं म्हणतात! योगायोगानं मला ‘सच्चा झूठा’पासून पुढे सतत कॉमेडी आणि व्हिलन अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या. मग इंग्रजी रंगभूमीवर कॉमेडी करताना वेगळं वाटलंच नाही. त्यासाठी मी भरत दाभोळकरला मानतो. तो माणूस नटाला पूर्ण स्वातंत्र्य देतो. प्रत्येक नटाला भूमिका दिल्यावर त्या नटाने त्याच्यासाठी काही विचार केलेला असतो, यावर त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तो मला रंगमंचावर मुक्त सोडतो. दिग्दर्शकानं नटाला मोकळिक देणं, हे त्याच्या अभिनयाच्या उन्नयनासाठी फार महत्त्वाचं असतं. मला किती तरी वेळेला कॉमेंट मिळाल्यात की, हे स्टेज पे यू आर डुइंग एक्सलंट मॅन! फिर सिनेमामें ऐसा छोटा छोटा काम क्यूँ करता है? ही कॉमेंट वरवर पाहता विरोधाभास वाटेल. पण त्यात एक लिंक आहे, ती म्हणजे मी हिंदी चित्रपटात दुय्यम भूमिका करतो. त्यातही काही वेगळं देण्याचा प्रयत्न असतो आणि तो प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. म्हणूनच मला स्टेजवर पाहताच ते अशी कॉमेंट देतात. त्यामुळे एखाद्या नटाला विकसित आणि प्रस्थापित व्हायचं असेल तर सिनेमा हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचं माध्यम आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.’’
विजूदा मराठी नाटकं पाहतात. त्यात काम करताना आपली भाषा आड येईल असं आपल्याला वाटतं, असं ते प्रांजळपणे सांगतात. मुंबईकर सारस्वत असूनही सगळं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्याकारणाने आपण गोव्याकडच्या व्यक्तिरेखेला अधिक चांगला न्याय देऊ शकतो, असा त्यांना विश्वास आहे. ‘उत्तरायण’ या चित्रपटातला त्यांनी साकारलेला बाबू बोरकर म्हणूनच आपल्या लक्षात राहतो. खरं म्हणजे नटाला भाषा नसते, पण त्या नटाला दिलेल्या व्यक्तिरेखेला भाषा असते. ही भाषा जर शुद्ध मराठी असेल तर आपल्याला खूप सराव करावा लागेल, असं विजूदांना वाटतं आणि तसं ते कबूल करतात, हेच त्यांचं मोठेपण आहे.
आजकाल भाषा ही ग्रांटेड धरतात. ते चुकीचं आहे. भाषा हे अभिव्यक्तीचं मोठं साधन आहे. त्यामुळे नट म्हणून मला दिलेल्या व्यक्तिरेखेला साजेशी भाषा मला बोलता यायलाच पाहिजे. मी इंग्रजी वातावरणात वाढल्यामुळे माझी मराठी धेडगुजरी आहे. ती लहानपणापासून आहे. म्हणजे असं की, अंगाला साबण लाव याऐवजी मी म्हणणार अंगाला साबू लाव! मला हे हवं आहे, याऐवजी माझ्या तोंडात मला हे पायजे असंच बसलंय. धीस इज नॉट प्रॉपर मराठी आय नो. मग मला गोवन किंवा किरिस्ताव व्यक्तिरेखा मस्त जमतात. मी अभिनेता आहे. त्यामुळे प्रमाणित भाषेचा अभिनिवेश मला अत्यंत चांगल्या रीतीने घेता येतो. पण मी अशा मिश्र भाषेत जास्त कंफर्टेबल असतो. हिंदी बोलतानाही मी मस्त असतो.
विजू खोटे म्हणजे १९७५ला प्रदर्शित झालेल्या ‘शोले’मधला कालिया असं समीकरणच झालंय। अगदी लहान मुलांनादेखील विजूदा म्हणजे कालिया असेच माहिती आहेत. कालिया साकारतानाही त्यांनी कॉमेडी आणि व्हिलन यांचं मिश्रण सादर केलं होतं. अभिनय म्हणजे काय? असं त्यांना विचारताच क्षणाचाही विचार न करता त्यांनी उत्तर दिलं, मीही अजून शोधतोय! इतकी विनम्रता या कलावंताकडे आहे. गेली चार दशकं या इंडस्ट्रीत वावरूनदेखील लहान मुलाच्या कुतूहलाने आणि निरागसतेने प्रत्येक भूमिकेचा अभ्यास ते करतात. यातूनच ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अदलाबदली’ यासारख्या चित्रपटांतून वेगळ्या बाजाच्या भूमिका ते साकारू शकले. एक सोपा कलावंत असंच विजू खोटे यांचं वर्णन करावं लागेल. स्क्रिप्ट चागलं असायलाच हवं, हा त्यांचा आग्रह आहे. कालिया, गँगस्टर, डाकू, डॉनचा उजवा-डावा हात, विमा एजंट अशा विविध भूमिका साकारताना या स्क्रिप्टचाच मागोवा विजू खोटे यांनी घेतला आणि आजही घेत आहेत. म्हणूनच ‘भगतसिंग’ चित्रपटात केवळ एका सीनसाठी काम करताना त्यांना कुठंही मानहानीकारक वाटत नाही. छोट्या छोट्या भूमिका करताना मोठा मोठा होत जाणा-या या कलावंताचा प्रवास अखंड सुरूच आहे.


www.prahaar.in

No comments:

Post a Comment