Thursday, June 18, 2009

माझ्या आयुष्याचं कल्याण झालं...

प्रहार प्रतिनिधी

ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणा-या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चा बुधवारी स्वीकार केला.

मुंबई : माझ्या गुरूच्या पावन स्पर्शाने पुनित झालेला हा पुरस्कार. मी धन्य झालो. माझ्या आयुष्याचं कल्याण झालं.., असा कमालीचा आदरभाव व्यक्त करत ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणा-या चित्रभूषण पुरस्काराचा बुधवारी स्वीकार केला.

स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ५१ हजार रुपये रोख अशा स्वरूपातील हा पुरस्कार रवींद्र नाट्यमंदिरात रंगलेल्या एका शानदार पुरस्कार सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जठार यांना प्रदान करण्यात आला. रामनाथ जठार यांच्या पत्नी इंदिराबाई जठार यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, किरण शांताराम, रामदास फुटाणे, सांस्कृतिक सचिव अजय आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक विभागासाठी यावर्षी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कोल्हापूर येथील चित्रनगरीचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याची माहिती या वेळी सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली। रामनाथ जठार यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांनी राज्याची प्रतिमा वृद्धिंगत केली असल्याचेही ते म्हणाले. या वेळी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळवलेल्या कलाकार-तंत्रज्ञांचा महामंडळाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment