
संदेश भंडारे
एक ‘थीम’ घेऊन छायाचित्रण करणारा छायाचित्रकार, असा माझा उल्लेख होत असतो. हे अगदी मनापासून सांगतो की, मी एखादा विषय प्रथम घेतो आणि मग छायाचित्रणाला सुरुवात करतो, हे अर्धसत्य आहे.
एक ‘थीम’ घेऊन छायाचित्रण करणारा छायाचित्रकार, असा माझा उल्लेख होत असतो. हे अगदी मनापासून सांगतो की, मी एखादा विषय प्रथम घेतो आणि मग छायाचित्रणाला सुरुवात करतो, हे अर्धसत्य आहे. मी स्वैरपणे वेगवेगळे प्रसंग मनाला भिडतील तसे छायाचित्रबद्ध करीत असतो. काही काळ गेल्यावर आपोआप एखादा विषय आकाराला येतो आणि तो छायाचित्र प्रदर्शनातून लोकांसमोर मांडला असता थीमस्वरूपात समोर येतो.
इथे ‘देवळी कोनाडा’ या छायाचित्र मालिकेबाबत सांगणं आवश्यक वाटतं. मी कामानिमित्ताने शिरूर येथील माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या जुन्या घरामध्ये एका देवळीमध्ये वर्तमानपत्रांची रद्दी कोंबून ठेवली होती. त्याशेजारील देवळीमध्ये कायद्याची पुस्तकं ठेवली होती व त्यावर मोटारसायकलवर घालायचं हेल्मेट काळजीपूर्वक ठेवलं होतं. हे पाहताच मला आजच्या काळात देवळी कोनाड्यांचा संदर्भच बदलल्याचं प्रथम लक्षात आलं. जुन्या काळात देवळी -कोनाडय़ात दिवा अथवा देव ठेवले जात असत. आज त्याचा उपयोग आपल्या बदललेल्या जीवनशैलीनुसार कसा झाला आहे, हे पाहून मी चकित झालो. जुन्या वास्तुरचनेमधील आज अडगळीत पडलेल्या या देवळी कोनाड्यांचा रोजच्या जगण्यात कसा उपयोग करून घेतला आहे, हे मला त्याचं वेगळेपण वाटतं.
मी याचं छायाचित्र घेतलं, तेव्हा मला पूर्वी काढलेलं एक छायाचित्र आठवलं. शहरातील जुने वाडे पाडून त्या जागी नवीन अपार्टमेंट, फ्लॅट उभे राहतात. त्यामुळे पाडलेल्या जुन्या वाडय़ांतील देवळी कोनाडय़ांच्या भग्नावशेषांचं ते छायाचित्र आठ वर्षापूर्वी काढलं होतं. अशाच एका जुन्या वाडय़ातील भाडेकरूंची विजेची मीटर्स एका देवळीमध्ये लावल्याचं छायाचित्र परंपरा व आधुनिकतेचा सुरेख संगम झाल्याचं दिसत होतं. अशा प्रकारची आठ ते दहा छायाचित्रं माझ्याकडे आहेत, हे मला आढळलं. या वर्तमानपत्रांच्या रद्दीच्या छायाचित्रामुळे मात्र या प्रकारच्या विषयाकडे माझं लक्ष वेधलं आणि मग पुढे वर्ष-दोन र्वष मला या आकाराने वेड लावलं. कुठल्याही गावात गेलो की, तेथील जुनी घरं शोधायची, मालकाकडून आतील भागांतील छायाचित्रं काढायची परवानगी घ्यायची, हे सत्र सुरू झालं.
फार कुणाच्या ध्यानीमनी न आलेला हा आकार. त्यामध्ये टीव्ही, मुद्गल, कंदील, बाटल्या, रोजमेळ-खतावण्या आदी रोजच्या वापरातील वस्तूंमुळे समाजजीवनातील त्या लोकांचं आर्थिक व सामाजिक स्थान कळत-नकळत समजतं. जुन्या घराची ‘दास्तान’ आपल्याला कळते. हे होताना त्याची शोकेस झाली नाही हे जाणवतं.
महत्त्वाचे म्हणजे, या देवळींचा वापर जरी छायाचित्रात सूचित झाला असला, तरी तो वापर करणारी माणसे कुठल्याही छायाचित्रात दिसत नाहीत. पण देवळी कोनाडय़ांचं स्वरूप त्या माणसांविषयी बरंच काही सूचित करतं. यातील एक गोष्ट नक्कीच जाणवते ती म्हणजे देवळी कोनाडे असलेली ती घरं, त्यातील माणसं, त्यांची जीवनशैली या गोष्टी आता हळूहळू नाहीशा होऊ लागल्या आहेत. ही जाणीव जुनी घरे, रिकामे कोनाडे, त्यांचं भकासपण यांतून तीव्र होते.
त्याचबरोबर त्याचं रूप कसं बदलत चाललंय, त्याचा किती वेगळय़ा प्रकारे वापर केला जातो, आधुनिक काळात हा कसा नष्ट होत जात आहे, हे या छायाचित्रांतून स्पष्ट होतं.
वास्तविक कोनाडा हा घराचा किती छोटासा आकार, पण त्यातूनसुद्धा माणसाच्या संपूर्ण जीवनशैलीवर प्रकाश पडतो आणि एका साध्या वेधक हाताळणीने सामान्य व अभिजनांचं एक वेगळय़ाच प्रकारे लक्ष वेधून घेतलं जातं.
या विषयामध्ये छायाचित्रकलेतील तथाकथित सौंदर्यात्मक दृष्टिकोन नाही. हे कोनाडे सुंदर दिसतात, पण ते सुंदर दिसावेत, या हेतूने अजिबात टिपलेले नाहीत।www.prahaar.in
No comments:
Post a Comment