Tuesday, June 30, 2009

केजी टू पीजी


डॉ. स्नेहलता देशमुख

सध्याच्या शिक्षणात आपला मेंदू मोठय़ा प्रमाणावर काम करतो, त्या मानाने आपण शरीराला काम देत नाही, व्यायाम देत नाही।


किंडर गार्डन ते पदव्युत्तर शिक्षणाचा आज साकल्याने विचार व्हायला हवा आहे. आपण गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाकडून आता सायबरकुल शिक्षणापर्यंत आलो आहोत. शिक्षणाच्या तंत्रात गेल्या काही वर्षात आमूलाग्र बदल झाले आहेत, मात्र सध्याच्या शिक्षणात आपला मेंदू मोठय़ा प्रमाणावर काम करतो, त्या मानाने आपण शरीराला काम देत नाही, व्यायाम देत नाही.

शिक्षणामध्ये केवळ अभ्यास करता उपयोगाचा नाही. तर त्या शिक्षणात खेळ पाहिजे, संगीत पाहिजे, एखादी कला पाहिजे तर ते शिक्षण सर्वागिण होईल. पूर्वीच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना हे सर्वागिण शिक्षण मिळत असे. आता मात्र तसं शिक्षण मिळताना दिसत नाही. आपल्या देशातल्या शिक्षणाचा विचार केल्यास आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायला हवा. एक शहरातलं शिक्षण आणि दुसरं ग्रामीण स्तरावरचं शिक्षण. आपण ग्रामीण भागातल्या शिक्षणासाठी सर्वशिक्षा अभियानासारख्या योजना राबवतो, मात्र हे तपासून पाहायला हवं की, या ग्रामीण स्तरावर शिक्षणाच्या पायाभूत सुविधा आहेत का? तिथे चांगले शिक्षक आहेत का? जे नवं तंत्रज्ञान आपल्याला शहरात उपलब्ध आहे, त्याची किमान माहिती या शिक्षकांना आहे का, याचा विचार करायला हवा आहे. त्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आपल्याला योग्य ते बदल करायला हवेत, जेणेकरून ग्रामीण आणि शहरी शिक्षणामधली दरी कमी होऊ शकेल.

मुंबई बोर्डाच्या विभागीय सचिव बसंती रॉय यांनी मागे एक विचार मांडला होता, तो म्हणजे तणावविरहीत शिक्षणाचा. आज मुलांवर अभ्यासाचा, मिळणा-या गुणांचा मोठा ताण येतो. त्यांना कार्टुन्सच्या माध्यमातून, खेळांच्या माध्यमातून शिक्षण मिळायला हवं. बालकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी शिक्षणाचा ताण घेऊ नये अशी शिक्षण पद्धती असावी असं त्यांचं मत होतं. अर्थात, मुलांना हे केवळ सांगून होणार नाही. त्यासाठी आपणच काहीएक पद्धती विकसित करायला हवी आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शेवटच्या परीक्षेच्या वेळी येणारा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आपण अंतर्गत मूल्यमापन पद्धत सुरू केली. मुलं वर्षभर जो अभ्यास करतात, त्याची पडताळणी शाळेच्या पातळीवर करणारी ही पद्धत होती.

मुलं वर्षभर काय करतात, हे त्यांच्या वह्या, त्यांची शाळेतली वागणूक पाहून हे गुण दिले जावेत, अशी अपेक्षा होती. मात्र हे गुणही शेवटी परीक्षांमार्फतच दिले जातात, असं आढळून येतं. त्यामुळे या पद्धतीचा मूळ हेतूच नष्ट होतो. दुसरं असं की, आपण साधारण दीड महिन्याच्या अंतराने चाचणी परीक्षा घेतो. त्यामुळे होतं काय की, मुलं केवळ तेवढय़ाच अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात. परीक्षा झाली की तो मागे पडतो आणि पुढचा अभ्यासक्रम वाचला जातो. शिक्षणाचा सलग विचार होणं महत्त्वाचं आहे. मुलांना खेळता खेळता शिक्षण घेण्याच्या संदर्भातला एक अहवाल माजी कुलगुरू रामजोशी यांनी दिला होता. तो आजही शासन दरबारी असाच कोणत्याही विचारांशिवाय पडून राहिला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ती शिक्षकांच्या पगाराची. आज जर आपल्याला लोकांनी शिक्षकीपेशा हा गंभीरपणे स्वीकारायला हवा असेल तर त्या पदाची पत वाढली पाहिजे. शाळांच्या व्यवस्थापनावरही काहीएक अंकुश असायला हवा. केवळ आधुनिक तंत्रज्ञान असून उपयोगाचं नाही. तर त्यासाठी व्यवस्थापन, कर्मचारी आणि शिक्षकवर्गही पुरेसा प्रशिक्षित हवा. तरच आपण शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल आणू शकतो.

http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment