नैसर्गिक जलसंपदेचा आटणारा स्रोत ही तर विश्वव्यापी ज्वलंत समस्या होतेय. पाण्यासाठी यादवी होण्याचा संभाव्य धोका जलतज्ज्ञांनी अनेकदा दिलाच आहे. अशावेळी राजापूरच्या देवदुर्लक्ष गंगेसारख्या निसर्ग जलस्रोताची शास्त्रीय चिकित्सा होऊन आमच्या पाण्याची गरज भागली तर अशी स्थळं खऱ्या अर्थाने तीर्थाटन क्षेत्र होतील.
विश्वनिर्मात्या सूर्यनारायणाची पृथ्वी निर्मिती हा एक अजब चमत्कार आहे. त्या पृथ्वीला वसुंधरा- अवनी, भूमाता संबोधून आपला आदर व्यक्त करतो. निसर्ग चमत्कारांनी निर्मिती झालेल्या पृथ्वीवर निसर्ग दौलतीची जशी खरात आहे, त्याचप्रमाणे तिच्या महाकाय उदरातून प्रकट होणाऱ्या अनेक चमत्कृतीजन्य रहस्यांचा शोध घेणं, हे मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. कधी तिचा प्रचंड उद्रेक होऊन भूपृष्ठावरील वैभवशाली महानगरांचं अस्तित्वच नष्ट करणारा भूकंप, तर कधी अनेक मैलांचा परिसर उष्णतेने भाजून काढणारा ज्वालामुखीचा आविष्कार पृथ्वीमाता आपल्या अंतरंगातील उद्रेकाने दाखवत असते.
असाच चमत्कार महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या उष्ण पाण्याच्या कुंडांतून दिसतो. तसाच चमत्कार अनिश्चित काळाने प्रकट होणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात अवतरणा-या गंगेद्वारे अनुभवायला येतो. राजापूरपासून ५ किमीवरील डोंगर सान्निध्यातल्या ‘उन्हाळे’ गावी ही गंगा प्रकट होते तेव्हा निसर्ग चमत्काराचा हा नजारा अनुभवण्यासाठी महाराष्ट-कर्नाटकातील भाविक पर्यटकांची गर्दी होते.
गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी येथे एकूण १४ कुंडांचा समूह असून त्यांना देशातील प्रख्यात नद्यांची समर्पक नावे दिली आहेत. भूमातेचा चमत्कार दाखवणारी ही लहरी गंगामाई कधी येणार आणि कधी लुप्त होणार याचे निश्चित वेळापत्रक नाही. कधी ती एक-दीड वर्षात अवतरलीय तर कधी १०-१२ वर्षे तिने भाविकांना वाट पाहायला लावलीय. १९५७ पासून एकूण २३ वेळा गंगा प्रकट झाल्यावर १५ दिवसांपासून ९० दिवसांपर्यंत तिचा मुक्काम राहिलेला आहे. आजही ही गंगा सुखद आगमनाबरोबर धान्याचा कोंडा प्रवाहाबरोबर घेऊन यायला विसरत नाही. पृथ्वीमाता भरभरून दान देतेय याचं जणू ‘सबूत’ आहे. या गंगेच्या सहजसुंदर प्रवाहाच्या मार्गाला बाधा होणार नाही, अशाच तऱ्हेने तिचं पाणी सभोवतालच्या कुंडातून वहात असतं. जलस्रोताचं महत्त्व जाणून त्याचं संवर्धन करणारी ही कुंडं कोणत्या ऐतिहासिक काळात बांधली, हे त्या गंगेइतकंच गूढ आहे. पण कुंडांचा टिकाऊपणा साधण्यासाठी वापरलेलं कातळ व त्याची सौरचना आमच्या पुरातन प्रगत स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे.
इ.स. १६६१ मध्ये छत्रपती शिवरायांनी राजापूर वखार मोहिमेप्रसंगी या पवित्र ठिकाणाला भेट दिल्याचं इतिहास सांगतो. तसंच १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात कविराज मोरोपंतांनी या निसर्ग भूमीच्या अनुभूतीवर अजोड काव्यनिर्मिती केली.
दयाधन निसर्गाचं बेलगाम औदार्य अनुभवताना त्याचं रहस्य व शास्त्र सजावून न घेतल्याने आपल्या समाजमनात पौराणिक भाकड कथा आणि सांगोपांगी दंतकथांचा पगडा मोठा आहे. राजापूर गंगेची शास्त्रीय चिकित्सा करण्यासाठी वैज्ञानिक-भूगर्भ शास्त्रज्ञाचे प्रयत्न अपुरे आहेत. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी-अकलोलीच्या गरम पाण्याच्या कुंडांप्रमाणे या गंगेच्या पाण्यात गंधकाचं प्रमाण असल्याने त्वचारोग निवारणाला उपयोग होतो. येथील प्रमुख काशी कुंडातील सरासरी तापमान ३२ अंश सेल्सिअस असतं. मात्र समूहातील इतर कुंडांच्या कातळाच्या वेगवेगळेपणामुळे त्याचं तापमान विविध आहे. या स्थानी सेवा रुजू करणाऱ्यांना ‘गंगामुख’ असं संबोधलं जातं. त्यांची अनेक परंपरागत घराणी आहेत. गंगा प्रवाह काळात कुंडांच्या सभोवती व दीपमाळेवर दीपोत्सव साजरा केला जातो.
सा-या कोकण प्रदेशात सध्या पाण्याचं दुर्भीक्ष्य आहे. १० दिवसांपूर्वी पहाटेच्या निरव शांततेत काहीएक आसभास नसताना नाचणीच्या कोंडय़ासह उसळी मारून पाणी बाहेर यायला लागलं आणि अल्पावधीतच सारी कुंडं पाण्याने भरून वाहू लागली. २००७नंतर गंगामाई तशी लवकरच अवतरली.
भाविकपणा, धार्मिकता, श्रद्धा याचा समाजाला आधार असतोच, त्याची आवश्यकताही मान्य केली तरी या जलस्रोतासह अन्य घटकांचं योगदान कसं उपयोगी ठरेल, यासाठी या निसर्ग चमत्काराची शास्त्रीय चिकित्सा होणं गरजेचं आहे.. राजापूरच्या या गंगेचं अचानक अवतरणं आणि लुप्त होणं या चमत्कारापाठीमागे शास्त्रीय चिकित्सा करणाऱ्यांच्या निष्कर्षानुसार आपण शाळेत शिकलेल्या वक्रनलिकेचं तत्त्व असावं, असा तज्ज्ञांचा कयास आहे. भूकंप आणि अन्य भूगर्भीय स्थित्यंतरांमुळे जमिनीच्या अंतरंगात खोलवर वक्रनलिकासदृश भेगा तयार होऊन त्या पाण्याने व्यापल्यावर एका बाजूने पाणी प्रवाह वर येतो व त्या पाण्याचा साठा संपल्यावर हा प्रवाह थांबतो, ही प्रक्रिया भूगर्भात ठराविक काळ चालूच राहिल्याने गंगा आगमन-निर्गमन अनिश्चित काळ चालूच राहाते, असा त्यांचा अंदाज आहे.
सुमारे ५५ वर्षापूर्वी भाक्रा-नानगल धरण अनावरण- राष्ट्रार्पण प्रसंगी स्व. पंडित नेहरूंनी सांगितलंच होतं.. ‘‘ही धरणं म्हणजे आधुनिक विज्ञानयुगाची तीर्थक्षेत्रंच आहेत.’’आज तरी धरित्रीच्या अंतरंगाचा वेध घेणारी, परिपूर्ण शास्त्रीय चिकित्सा करणारी यंत्रणा नसल्याने उपरोक्त निष्कर्ष हा एक तर्कच आहे. तोपर्यंत.. ‘‘देवाची करणी आणि नारळात पाणी’’ असं म्हणत- गंगास्नान करून पुण्यवान होऊ या!..http://www.prahaar.in
No comments:
Post a Comment