Tuesday, June 9, 2009

कोण ख्रिश्चन? कोण मुस्लिम?

आल्हाद गोडबोले

ओबामांचे कैरोतील भाषण म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता. इस्लाम जगताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू बनलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांचे हे भाषण नव्हते; भूगोलाचा भावी इतिहास बदलू पाहणाऱ्या एका दुर्दम्य आशावादी माणसाची, कोणत्याही धर्म-वंश-राष्ट्राच्या कुंपणापलीकडे जाऊ पाहणा-या एका मानवतावाद्याची ती प्रामाणिक हाक होती.

दूरचित्रवाणी ऊर्फ टीव्हीवरील कोणतेही दृश्य त्याचा प्रेक्षकवर्ग २० सेकंदांपेक्षा अधिक काळ पाहत नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. बीबीसी हे या क्षेत्रातील आघाडीचे चॅनल. १९८२ मध्ये, म्हणजे तब्बल २७ वर्षापूर्वी बीबीसीच्या लंडनमधील स्टुडिओला भेट दिली होती, तेव्हा तेथील एक अधिकारी सांगत होता की, आम्ही पडद्यावरील दृश्य १९ सेकंदांपेक्षा जास्त काळ ठेवत नाही; जाणीवपूर्वक बदलतो. याचे कारण हेच. हातातील रिमोट कंट्रोलचे बटण दाबत सतत चॅनल्स बदलत राहणारा माणूस पाचही खंडांमध्ये आढळतो. २० सेकंद स्थिर राहायचे नाही, हा त्याच्या चंचलतेचा स्थायीभाव असतो.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे कैरो विद्यापीठातील लाइव्ह भाषण संपल्यानंतर लक्षात आले की, तब्बल तासभर आपण खुर्चीला खिळून बसलो होतो आणि उगाचच हातवारे किंवा हावभाव न करता ओघवते भाषण देत असलेल्या ओबामांचे जवळजवळ स्टिल चित्र सलग तासभर आपण पाहत होतो. बातमी सांगतानाही नाचरेपणा करणा-या बातमीदारांना आणि त्यांच्या चॅनलच्या अधिका-यांना, याच छोटय़ा पडद्यावरून खिळवून ठेवणारेही काही दाखवता येत असते, हे शिकवण्यासाठीही बहुधा ओबामांना अवतार घ्यावा लागत असेल. मुद्दा हा की, ओबामांचे कैरोतील हे भाषण म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता.

अफगाणिस्तान आणि इराकमधील लष्करी कारवाईमुळे इस्लामविरुद्ध धर्मयुद्ध पुकारलेल्या ख्रिश्चन राष्ट्रांचा म्होरक्या अशी पश्चिम आशियात अमेरिकेची प्रतिमा रंगवली जात आहे. नाइन इलेव्हनपासून माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या रोखाने फेकण्यात आलेल्या जोड्यापर्यंतच्या साडेसात वर्षातील अनेक घटनांमधून मुस्लिम जगताचा हा द्वेष व्यक्त झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ओबामा यांनी थेट इजिप्तची राजधानी कैरो येथे यावे आणि जोडय़ांऐवजी टाळ्यांच्या वारंवार कडकडाटाची दाद घेत भाषण करावे, हे विलक्षण आहे. ज्यांनी हा जिवंत अनुभव निदान छोट्या पडद्याच्या माध्यमाद्वारे घेतला असेल, त्यांनाही हे मान्य करावे लागेल की, इस्लाम जगताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू बनलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांचे हे भाषण नव्हते; भूगोलाचा भावी इतिहास बदलू पाहणाऱ्या एका दुर्दम्य आशावादी माणसाची, कोणत्याही धर्म-वंश-राष्ट्राच्या कुंपणापलीकडे जाऊ पाहणा-या एका मानवतावाद्याची ती प्रामाणिक हाक होती.

ख्रिश्चन पाश्चिमात्य राष्ट्रांचा हा प्रमुख इस्लामी शिकवणीची गंगोत्री आणि एक हजार वर्षाची परंपरा असलेल्या अल्-अझरमध्ये तसेच पुरोगामी इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोत येऊन अस्सलाम आलेकुम म्हणत भाषणाची सुरुवात करतो; तमाम मुस्लिम जगताला पवित्र कुराणाचे दाखले देतो. त्यांची मने जिंकतो. अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर पहिल्याच भाषणात त्याने ग्वाही दिली होती की, मी प्रामाणिक आहे.. मी तुमचे म्हणणे ऐकून घेईन.. आपले मतभेद असतील, अशा वेळी तर मनापासून आणि लक्ष देऊन..कैरोतही त्याचीच साक्ष ओबामांनी दिली.

अमेरिका आणि मुस्लिम राष्ट्रे यांच्यात मतभेद आहेतच. नुसती तेढ नाही, तर वैर आहे. एकमेकांना संपवण्याच्या भाषेतच बोलणारे हे दोन ध्रुव एकत्र आणणे हे स्वप्न आहे. खुद्द ओबामांना त्याची जाणीव आहे. एका भेटीने किंवा भाषणाने क्रांती घडून येत नसते, पण त्याची सुरुवात करण्यासाठी एकाला एखादे पाऊल मागे घेत हात पुढे करण्याचा संकेत द्यावा लागतो. मतभेद असूनही प्रतिपक्षाला समजून घेण्याचा मनाचा मोठेपणा ओबामांनी दाखवला, हेच त्यांच्या कैरो-भेटीचे महत्त्व.

न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याची जखम अमेरिकी जनमानसात अजूनही ओली आहे. अमेरिका विरुद्ध अफगाणिस्तान, इराक, ओसामा, तालिबान वगैरे असा संघर्ष तेव्हापासूनच तीव्र बनला आहे. या वणव्याची झळ आसपासच्या देशांनाच नव्हे, खंडांनाही बसली आहे.

वसाहतवाद आणि शीतयुद्धाच्या काळात मुस्लिमांवर अन्याय झाला, त्यातून दहशतवादाचा राक्षस निपजला, हे ओबामाही मान्य करतात. पण वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात बळी गेलेल्या सुमारे तीन हजार नागरिकांचा त्यात काय अपराध होता? निरपराधाची हत्या म्हणजे मानवधर्माची हत्या, ही कुराणाचीच शिकवण आहे. मात्र ती सांगण्यासाठी ओबामांना कैरोला यावे लागते! त्याचबरोबर एका माणसाचा जीव वाचवणे म्हणजे मानवजातीचे रक्षण करणे होय, हेही शिकवावे लागते.

जन्माने ख्रिश्चन असलेल्या ओबामांना हे सारे मुस्लिम जगताला सांगण्याचा अधिकारच काय, असा प्रश्न कुणी करू शकतात. असा प्रश्न कदाचित बुश महोदयांवर फेकता आला असता; ओबामांना नव्हे. कारण मुळात बुश आणि ओबामा यांचे पक्ष जेवढे विरुद्ध, तेवढीच त्यांची वैचारिक बैठकही भिन्न आहे. बराक हुसेन ओबामा असे नाव असलेल्या ओबामांचे पितृघराणे केनयातील अनेक पिढय़ांच्या मुस्लिम परंपरेचे आहे. मी ख्रिश्चन आहे, असे सांगताना ते या पिढीजात वारशाचा आणि पवित्र कुराणाच्या शिकवणीचा अभिमानाने उल्लेख करतात, तो केवळ तोंडदेखलेपणातून नव्हे.

हवाई विद्यापीठात रशियन भाषेचा अभ्यासक्रम शिकताना प्रेमात पडून विवाहबद्ध झालेले सीनियर बराक ओबामा आणि अ‍ॅन डनहॅम हे जोडपे बराकच्या जन्मानंतर अल्पावधीतच विभक्त झाले. त्यानंतर आईने इंडोनेशियन मित्राबरोबर पुनर्विवाह केल्यावर जकार्ता आणि इतर ठिकाणी शिकलेल्या, तिथून होनोलुलूला परतलेल्या आणि पुढे अनेक वाटावळणांनी व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचलेल्या ओबामांना मुळात ख्रिश्चन तरी म्हणावे का? ख्रिश्चन राष्ट्रांचा प्रमुख म्हणून त्याच्याविरुद्ध जिहाद पुकारताना इस्लामी जगतालाही नीट विचार करावा लागेल.

ओबामा यांनी कैरोत केलेले भाषण मुळात शब्दश: ऐकण्यासारखे/ वाचण्यासारखे आहे. मुद्दा एवढाच की, गेली साडेसात वर्षे खदखदत असलेल्या संघर्षाला त्यांनी दिलेले परिमाण म्हणजेच ज्वालामुखींच्या धगधगत्या प्रदेशात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचे आणि सा-या विश्वाला स्वधर्मसूर्ये पाहण्याचे स्वप्न दाखवणारे पसायदान आहे. या प्रार्थनेत सर्वानीच मतभेद, भेदाभेद विसरून सहभागी व्हायला हवे!

http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment