Wednesday, June 17, 2009

संस्कारांची शिदोरी

प्रहार

संस्कारांची शिदोरी कसबा पेठेच्या वातावरणात मिळाली. आई-वडिलांनी त्याचं महत्त्व मनात बिंबवलं. आज आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर हेच संस्कार कळत-नकळतपणे यशाचा मार्ग दाखवून देत असल्याचं ‘वाडी-वस्ती’त सांगत आहेत प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके.

माझी नोकरी गेली तो दिवस. भल्या पहाटे अप्पा बळवंत चौकात मालकाने माझ्या मुस्काटीत मारली तो दिवस. पेपरची लाइन टाकत होतो. एके दिवशी साडेपाचऐवजी सव्वासहा वाजता पोहोचलो. वेळ चुकली. खाड्कन कानाखाली आवाज झाला.

ही काय यायची वेळ झाली? माझं गि-हाईक गेलं, मालक संतापाने म्हणाला. माझी नोकरी गेली. मी आल्या पावली परत निघालो. मला सारखा माझ्या आईचा किस्सा आठवत होता. तिच्याच तोंडून मी तो अनेक वेळा ऐकला होता. पूर्वीच्या काळी रात्रीची जेवणं साडेसात-पावणेआठच्या सुमारास होत. सकाळचं जेवण साडेदहाला; कारण ब्रेकफास्ट वगैरे प्रकार नसे आणि रात्रीचं साडेसातला.

आईच्या सर्व मैत्रिणी आठच्या ठोक्याला कुठल्या तरी वाडय़ाच्या पायरीवर एकत्र बसत. टीव्ही नव्हता. तेव्हा गप्पा, किस्से, कहाण्या हे मनोरंजनाचं साधन होतं. आम्हीही मुलं आईच्या मागे जात असू. माझी आई एका शाळेत मोलकरणीचं काम करत होती आणि तिथे तिचा अपमान झाला होता. माझ्या आईला तो अपमान, ते शब्द इतके झोंबले की, तिने सरळ शाळा सोडली आणि स्वत:ची शाळा काढली. दुसरी पास झालेल्या एका स्त्रीने केवळ अपमान झाला म्हणून चौथीपर्यंतची शाळा काढली. हे कुठे तरी माझ्या डोक्यात थैमान घालत होतं. इथे मला मुस्काटीत बसली होती. माझाही अपमान झाला होता. मीही ठरवलं, पेपरची लाइन टाकण्याचा स्वत:चा व्यवसाय करायचा. माझी पहिली आणि शेवटची नोकरी गेली आणि माझा पहिला व्यवसाय सुरू झाला.

होलसेलवर वर्तमानपत्रे विकत घ्यायचे आणि सायकलवर टांग टाकून निघायचो. मी हा व्यवसाय करू लागलो आणि माझ्या लक्षात आलं की, (माजी) मालकाने मला मुस्काटीत मारली ते योग्य होतं. वर्तमानपत्रांची सवयही व्यसनासारखी गंभीर असते. सातला येण्याची सवय असेल, तर तो सातलाच यायला हवा, अन्यथा गि-हाईकाचं पुढचं सगळं वेळापत्रक बिघडतं. थंडी असो, पाऊस असो, वर्तमानपत्र एका ठराविक वेळेलाच दारापुढे पडायला हवं. माझ्या पहिल्याच व्यवसायाने मला वेळ पाळण्यामागील शिस्त शिकवली.

मी पुण्यात कसबा पेठेत वाढलोय. लोकमान्य टिळक त्याला तेला-तांबोळय़ांची वस्ती म्हणत. आज मला माझ्या वस्तीचा अभिमान वाटतो. खरं तर नकळतपणे कसबा पेठेने माझ्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला. मी ब्राह्मणातला कुलकर्णी कुठे वाढला पाहिजे होता, तर सदाशिव किंवा शनिवार पेठेत आणि तसा वाढतो तर मी कारकून झालो असतो. कारण सदाशिव-शनिवारमध्ये शेजारच्या जोशीकाकूंच्या मुलाबरोबर शिकून मीही अभ्यास खूप केला असता. स्कॉलरशिपला बसलो असतो. पण मी देशस्थ असल्यामुळे मला पंचावन्न-छप्पन्न टक्क्यांच्या वर मार्क कधीच मिळाले नसते. मग त्या काळच्या प्रथेप्रमाणे मी महाराष्ट्र बँकेत वशिल्याने कारकून म्हणून नक्कीच चिकटलो असतो. त्यापेक्षा मी कसबा पेठेत वाढलो. कसबा गणपतीच्या शेजारी माझं घर होतं- सव्वा खोलीचं. त्यात आई-वडील आणि आम्ही चार भावंडं. वडील पोलिसांत होते. त्यांना शिफ्ट असत. आई बिचारी काबाडकष्ट करून संसाराचा गाडा रेटत होती.

आम्ही भावंडं म्युनिसिपाल्टी शाळेत जात असू. शाळा नंबर २५. माझ्या आई-वडिलांनी कधीच असं सांगितलं नाही की, तू कष्ट कर. अर्थात मी आपणहून व्यवसाय करण्याच्या प्रयत्नाला लागलो, तेव्हा त्यांनी विरोधही केला नाही. लहानपणी आम्ही रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, एक वेळ जेवलो, काबाडकष्ट करून मोठे झालो, हे नाव कमावल्यावर मुलाखतीतून सांगणं फार शहाणपणाचं लक्षण मानलं जातं. दॅट इज राँग. हे आपल्या आई-वडिलांवर अन्यायकारक आहे. आम्ही खाऊनपिऊन सुखी होतो, असंच मी म्हणेन. अंगात रफू असलेली अर्धी चड्डी असेल, पण तो रफू दिसायचा नाही. वुई वेअर हॅप्पी विथ व्हॉट वुई वेअर.

शाळा सकाळ किंवा दुपारच्या शिफ्टमध्ये. सकाळी साडेअकराच्या सुमाराला शाळा सुटली की, मग पूर्ण दिवस करायचं काय? घरात रेडिओ असण्याइतपत देखील परिस्थिती नव्हती. (मी १९६० च्या आसपासची गोष्ट सांगतोय.) फक्त श्रीमंत मावशीकडे रेडिओ. मग दर बुधवारी बिनाका गीतमाला ऐकायला आम्ही तिच्या घरी जात असू. नाही तर मग करायचं काय, असा प्रश्न होता. होम वर्क किंवा क्लास असले शिक्षणाशी निगडित प्रकार जणू अस्तित्वातच नव्हते आणि क्लास वगैरे असतीलही कदाचित, पण आमच्या आवाक्याबाहेरच्या या गोष्टी होत्या.

रिकामा वेळ आणि संस्कार कधी घडतात, तर वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून पंधरा किंवा सोळाव्या वर्षापर्यंत. या वयात जी माणसं तुमच्या समोर येतात, तुमच्या बरोबर वावरतात, त्यांचा प्रभाव कळत-नकळत तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. मग माझी मित्रमंडळी कोण होती? तर रतन परदेशी, ज्याची चन्यामन्या-फुटाण्याची गाडी होती. गणेश, जो अमृततुल्य हॉटेलमध्ये नोकरी करत असे. भरत राठोड ज्याचा सुपा-यांच्या पुडय़ा भरण्याचा व्यवसाय होता. त्या काळी त्रिकोणी पुडय़ा असत आणि सुगंधी सुपा-या. जर्दा-प्लॅस्टिक नाही. अरुण कुलकर्णी ज्याचा भाऊ रिक्षा चालवत असे. हा अरुण कुलकर्णी सकाळी पेपर आणि दूध टाकत असे. त्यानंतर बबन गोळे ज्याच्या वडिलांचा टांगा होता. मी कसबा पेठेत अशा अवस्थेत राहत होतो की, हेच माझे सवंगडी होते. शाळा सुटल्यावर आम्ही शनिवारवाडय़ासमोर क्रिकेट खेळत असू. शनिवारवाडा हा माझ्या बालपणीच्या आठवणीतला महत्त्वाचा घटक आहे.

भरत राठोडचे वडील त्याला म्हणत, सुपारीच्या पुडय़ांची एक परात भर आणि मग तू खेळायला जा. आता क्रिकेट खेळायला मित्र तर हवा. मग मीही सुपारीच्या पुडय़ा भरायला बसत असे. रतन परदेशीचे वडील म्हणत, अहिल्यादेवी शाळेची सुट्टी संपली की, मग जायचं खेळायला. त्यांची चन्यामन्या-फुटाण्याची गाडी होती. दुपारची गाडी सांभाळणं हे रतनचं काम होतं. मित्रच मित्राला मदत करतो. मित्रावर जीव टाकतो. ते वयच असं असतं. मीही त्याच्यासोबत उभा राहत असे. माझ्या जीवावर तो गाडी सोडून जातही असे. माझा चन्यामन्या जास्त विकला जात असे. त्या वेळेच्या शाळा म्हणजे साध्या. हायफाय केंब्रिज तर सोडाच, पण इंग्लिश मीडियमसुद्धा नाही. शनिवार पेठेत अहिल्यादेवी मुलींची शाळा. कुठल्याही शाळेच्या बाहेर दोन समान व्यावसायिकांमध्ये स्पर्धा असते.

माझ्यासमोर दुसरी गाडी लागायची. गाडीवाल्याचा वेश असे- कळकट पायजामा, कळकट-मळकट बाह्या दुमडलेला शर्ट, डोक्यावर तिरकी टोपी, केस वाढलेले, चेह-यावर दाढीचे खुंट. त्याच्यासमोर मी शाळकरी मुलगा. रात्री झोपताना उशाखाली ठेवल्याने कडक इस्त्री झालेली खाकी हाफ पँट, स्वच्छ धुतलेला हाफ शर्ट, पायांमध्ये रबरी चपला आणि लहानपणापासून कम्पल्सरी म्हणजे कापलेले केस आणि डोक्याला तेल. डोक्याला तेल लावल्याखेरीज मी आजही घराबाहेर पडत नाही. तशी सवयच लागून गेलीय. कधीपासून हे आज आठवतदेखील नाही. पण एक स्वच्छ शाळकरी मुलगा आणि दुसरा कळकट माणूस, तर चन्यामन्या कुणाचे अधिक खपणार? लहानपणी कुठे तरी मनात आई-वडिलांनी रोवलं होतं की, तुम्हाला नीट-व्यवस्थित राहायचंय. मॅनर्सने जगापुढे जायचंय.

माझे आई-वडील दिवसभर कष्ट करायला घराबाहेर. त्यांच्यापाशी चॉईस नव्हता. दुपारी काय करा किंवा करू नका, हे सांगायला ते कधी आले नाहीत. मला वाटतं, गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये संस्कार आणि देवाच्या भरवशावर मुलं सोडली जातात. आई-वडिलांना खात्री असते, विश्वास असतो की, आपलं मूल वाया जाणार नाही. कधी कधी विश्वासाला तडा जातो. मूल भरकटतं. दोष बिचाऱ्या आई-वडिलांवर जातो. ते दोन वेळच्या जेवणासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी झटत असतात. त्यांना मुलांवर लक्ष ठेवायला वेळ कुठून मिळणार? मी सुपारीच्या पुडय़ा भरत असे. सुपारीवाल्याचे वडील महिन्या-दोन महिन्यांतून एकदा कधी तरी एखादा रुपया देत. चन्यामन्यावाला मित्रही दोन-पाच रुपये देत असे.

शाळेला कधी सुट्टी असेल, तेव्हा सकाळी अरुण कुलकर्णीसोबत गुलाबांच्या झाडांना पाणी घालायला जात असे. साठेंची नर्सरी होती. अलका टॉकीजच्या शेजारी, भारतीय विद्यापीठानजीक रवी बिल्डिंग आहे. त्या जागेवर साठेंची नर्सरी होती. तिथे गुलाबांना पाणी घालायचं. मग हातगाडीवर ती रोपं टाकून सदाशिव पेठेत विकायला घेऊन जात. या संपूर्ण प्रक्रियेला मुलांची आवश्यकता भासत असे. कधी चन्यामन्यातनं, कधी सुपारीतनं, तर कधी नर्सरीतनं, पण मला दरमहा पाच-दहा रुपये मिळू लागले एवढं नक्की. माझी आयुष्यातली पहिली कमाई आहे ती कधी आठव्या, नवव्या इयत्तेतली असावी. पेपर टाकण्याची नोकरी मिळाली आणि गेलीसुद्धा. पेपर टाकण्याचा व्यवसाय मी दहावीपर्यंत केला.

त्या वेळी पुण्यात तरुण भारत होता, विशाल सह्याद्री, प्रभात होते. केसरी आठवडय़ातून दोनदा निघत असे आणि अर्थातच सकाळ होता. बाकीची वर्तमानपत्रं इतक्या सकाळी म्हणजे साडेपाच वाजता येत नसत. मुंबईहून येणारी वर्तमानपत्रं म्हणजे आम्हा पेपरवाल्यांची दुपारची लाइन होती. साडेदहा वाजता लोकसत्ता यायचा दगडूशेठच्या देवळापाशी आणि महाराष्ट्र टाइम्स क्वॉर्टर गेटपाशी. अकरावी-मॅट्रिकचा निकाल लागायचा त्या दिवशी चार आण्यांचा अंक बारा आण्याला विकला जात असे. मी हळूहळू दिवाळी अंक विकायला सुरुवात केली. चार रुपयांचा अंक मला तीन रुपयांना मिळत असे. लोक म्हणत, तू आम्हाला किती सवलत देणार? मी म्हणायचो, तुम्ही माझ्याकडून अंक घेतलात, तर चार रुपयांचा अंक पावणेचार रुपयांना किंवा साडेतीन रुपयांनादेखील देईन.

शाळकरी मुलगा म्हणून काही लोक फिरकी घ्यायचे. म्हणायचे, दोन रुपयांना देशील का? मला इथे मार्केटिंग शिकायला मिळालं. मला वाटायचं, दोन रुपयांना म्हणजे हा माणूस आपली फिरकी घेतोय का? -तर घेतोय. मी म्हणायचो, दोन रुपयांना देतो. असं नुकसानीतलं गि-हाईक शंभरातून एखादं. डिस्काऊंट मागणारे शंभरात पाच टक्के. उरलेले काहीच मागत नाहीत. तुम्ही सवलत देता, त्यात ते खूश असतात. पण माऊथ पब्लिसिटी दणकावून होते. पाच टक्के माणसं जी दोन रुपयांचा अंक घेऊन वावरतात, ती स्वत:ची हुशारी सांगण्याच्या नादात तुमच्या व्यावसायिक कौशल्याची जाहिरात करत असतात आणि जनरली शाळकरी मुलाचा चेहरा किंवा अवतार पाहिला की, समाजाची मदत करण्याची वृत्ती असते.

मॅट्रिक झालो आणि वाडिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी इंजिनीअर व्हावं असं आईला वाटत होतं. मला मॅट्रिकला ५६ टक्के मार्क. पहिल्या वर्षी सुटलो हेच नशीब. फर्गसनला प्रवेश मिळण्याचा प्रश्नच नव्हता. कमी मार्क म्हणजेच वाडिया कॉलेज. पूर्ण मराठी शाळेतला मुलगा होतो. वाडियाला जाऊन साफ बिघडलो. मराठी विषय वगळता बाकी सगळय़ात नापास. मराठीला सोमण सर होते. त्यांनी शंभरापैकी ऐंशी मार्क दिले. यापेक्षा जास्त दिले, तर माझी नोकरी जाईल हे त्यांनी मला घरी बोलावून सांगितलं. पहिल्या वर्षअखेरीस आईला म्हटलं, मला माफ कर. झेपत नाही. मग तिने मला कॉमर्सला घातलं. मी एमएस कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये खूप धमाल केली. आम्ही कावळय़ांची अंत्ययात्रा काढली होती. अगदी रीतसर, साग्रसंगीत मुंडन करून तिरडी वगैरे घेऊन. पुण्यात ही अंत्ययात्रा भरपूर गाजली होती.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना झालंय तरी काय? असा अग्रलेख दुस-या दिवशी केसरीत छापून आला. कुठे जाणार ही नवीन पिढी वगैरे वगैरे. आम्हाला रस्टीकेट करण्यात आलं.

आज कशाची खंत वाटत नाही किंवा अमुक काही गोष्टी परिस्थितीमुळे राहून गेल्या, असंही वाटत नाही. त्या-त्या वयातली ती आव्हानं होती. भरपूर कष्ट केले, तेव्हा झोपही छान लागत होती. त्या वेळेस आई-वडिलांनी संस्कारांचं महत्त्व पटवलं. पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच संस्कारांची शिदोरी कळत-नकळतपणे कामाला आली. वळणावळणावर आव्हानं पेलण्यासाठी म्हणून जी मानसिक, आत्मीक ताकद लागते, ती या संस्कारांनीच मला मिळवून दिली।

http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment