बोरिवलीकरांना उतरू द्या व विरारसाठी रद्द झालेल्या गाडीऐवजी १२ डब्यांचीच गाडी सोडा या मागण्यासाठी प्रवाशांनी बोरिवली स्थानक सुमारे दीड तास डोक्यावर घेतले.
मुंबई- ‘बोरिवलीकरांना उतरू द्या’ आणि ‘विरारसाठी रद्द झालेल्या गाडीऐवजी १२ डब्यांचीच गाडी सोडा,’ अशा मागण्या करत विरार आणि बोरिवलीच्या प्रवाशांनी बोरिवली स्थानक गुरुवारी रात्री सुमारे दीड तास डोक्यावर घेतले! वाट्टेल तशी ‘व्यवस्था’ करणारे रेल्वे प्रशासन अखेर प्रवाशांच्या या रेट्यापुढे नमले आणि लोकलसेवा पुन्हा सुरू झाली.
प्रवाशांनी खच्चून भरलेली विरार लोकल तांत्रिक बिघाडामुळे रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी बोरिवली स्थानकातच थांबवण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवलीहून विरारसाठी नऊ डब्यांची गाडी सोडण्याचे पश्चिम रेल्वेने ठरवले; पण त्यासाठी बोरिवली हा शेवटचा थांबा असलेली एक गाडी तशीच पुढे विरारसाठी सोडण्यात येणार असल्याची घोषणा झाली! त्यामुळे ही गाडी पकडण्याची घाई करणा-यां विरारकरांनी बोरिवलीकरांना उतरूच दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या बोरिवलीकरांनी रुळांवरच ठाण मांडले.
या गाडीतून बोरिवलीच्या प्रवाशांना अगोदर उतरू द्यावे, एवढीच या प्रवाशांची मागणी होती. त्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यातच विरारकरही बारा डब्यांच्या गाडीवरच अडून राहिले.
या गदारोळात चौथ्या क्रमांकाच्या फलाटावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या गाडीमागोमाग येणा-या गाड्याही त्यामुळे रखडल्या. मात्र रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत प्रकरण चिघळू दिले नाही. शेवटी ब-याच मिनतवा-यांनंतर बोरिवलीकरांनी मांडलेला ठिय्या उठवला. तसेच बोरिवलीहून विरारसाठी आणखी दोन गाड्या सोडण्यात आल्या. यामुळे गाड्या सुमारे अर्धा तास उशिरा धावत होत्या. पावणेदहा वाजता ही गाडी विरारसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
www.prahaar.in
No comments:
Post a Comment