Tuesday, June 9, 2009

शोभेचा बाहुला


अभिजीत देसाई

सिनेमावाल्यांनी अमिताभची वाट लावली, की अमिताभने स्वत:ला देवबाप्पा करून स्वत:च्याच पायांवर धोंडा पाडून घेतला?
सिनेमावाल्यांनी अमिताभची वाट लावली, की अमिताभने स्वत:ला देवबाप्पा करून स्वत:च्याच पायांवर धोंडा पाडून घेतला? आव्हानात्मक चाकोरीबाहेरच्या भूमिका निभावण्याची त्याची (अमर्याद) ताकद पाहता हिंदी कमर्शियल चक्रव्यूहात अडकून तो स्वत:ची पडद्याबाहेरील इमेज अधिकाधिक बलवान करण्यात वेळ दवडतोय. ‘आयफा’चा ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर’ म्हणून अमिताभ पत्रकार परिषद घेतो. आणखी काही काळानंतर कदाचित ‘आयफा’चे अधिकारी आणि मुंबई-दिल्लीचे पत्रकार यांच्यात वार्तालाप घडवून आणण्याकरिता ‘पीआरओ’च्या भूमिकेत तो झकास ‘गेट-टूगेदर’ही घडवून आणेल.
कंपन्यांनी पैसे फेकायचे आणि ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर्स’ म्हणून मिरवणा-या ‘सेलिब्रिटी’ चेहऱ्यांनी त्यांच्यापाठी फिरत ‘बुगूबुगू’ म्हणून माना डोलवायच्या. हिंदी-मराठीत सगळीकडे असे ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर्स’ ऊर्फ नंदीबैल बोकाळलेत. निदान अमिताभ बच्चन नावाच्या माणसाने तरी भोलानाथ- नंदीबैलाच्या खेळापासून दूर राहायला हवं होतं. शोभेचा बाहुला म्हणून तो नक्कीच शोभत नाही.
पहिल्या खेळीत प्रचंड नाव, लौकिक कमावल्यानंतर अमिताभने आश्चर्यकारकरीत्या अशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्वेच्छानिवृत्ती ही संकल्पनाच नवी होती. इथे प्रेक्षकांनी लाथा घातल्याखेरीज खुर्ची सोडायची नाही, असा संकेत आहे. जो संकेत राजकारणातला, तोच सिनेमासृष्टीतला. दिलीपकुमार, राजेश खन्नासकट भल्याभल्यांनी इथे खुर्ची सोडण्यापूर्वी लाथा खाल्ल्यात. या पार्श्वभूमीवर अमिताभचं दूर जाणं हे त्याचं हॉलिवूड पद्धतीतलं वेगळेपण होतं. तो परतला त्या टप्प्यावर त्याचं ‘वेगळेपण’ संपलं. ‘मृत्यूदाता’, ‘लाल बादशाह’पासून दुसरी इनिंग्ज आणि गळतीला सुरुवात झाली.
सिनेमासृष्टी एकवीसाव्या शतकात प्रगल्भ झाली की काय, असं वाटायला लावण्याइतपत ‘खाकी’, ‘ब्लॅक’, ‘चिनी कम’, ‘सरकार’मधून वेगळय़ा भूमिका मिळाल्या. ‘आग’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘नि:शब्द’, ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘झूम बराबर झूम’सारखी कचरापट्टी समोर येतच राहिली. मिळेल ती भूमिका स्वीकारणं, यातच धन्यता मानणारा अमिताभ सिनेमासृष्टीतल्या तरुण दिग्दर्शकांचा ‘मसिहा’ होता. विपुल शहा किंवा बालकिशनला तो सहजी उपलब्ध होणं ही त्यांच्या दृष्टीने लॉटरी होती. तो मात्र मिळेल त्या सिनेमात टुकार-भिकार-ब्यॅक्कार भूमिका करून सिनेमा बाहेरच्या वास्तवात पुण्याईच्या बळावर आपली इमेज उंचावत होता. त्याच्यातली ‘नरो वा कुंजरो वा’ वृत्ती नेहमीच त्याच्या मदतीला धावून आली.
प्रेसवर बहिष्कार टाकूनही काडीमात्र नुकसान न झालेला हा एकमेव कलावंत असावा. अमिताभ-रेखा प्रकरणात वास्वत किती आणि अतिरंजित नाट्य किती, याचा शोध सामान्य जनतेला लागण्यापूर्वीच अमिताभने प्रेसवर बहिष्कार टाकला. रेखाने अमिताभची ‘री’ ओढली. रेखाचं भारीभक्कम नुकसान झालं. प्रेस मात्र अमिताभने बंदी उठवावी म्हणून वैयक्तिक पातळीवर कार्यरत होती. त्याला टाळून सिनेमासृष्टीची बातमी देणं हे १९७३ नंतरच्या कोणत्याही वर्षात शक्य झालेलं नाही. त्याच्यातील ‘नरो वा कुंजरो वा’ वृत्तीने बहिष्कार उठवण्यात यश मिळवलं.
राजीव गांधी सत्तेवर असताना सिनेमावाले संप पुकारण्याच्या तयारीत होते. राजेश खन्ना त्यांचं नेतृत्व करत होता. अमिताभ मात्र मूग गिळून राहिला. स्मिता पाटीलचं निधन झालं, त्या रात्री ‘होप ८६’ च्या चमचमाटात अमिताभने ‘अरे दिवानों, मुझे पहचानो, कहाँ से आया हूँ मैं डॉन’ गाण्यावर बेफाम नृत्य केलं. त्या वेळेस तो म्हणे संपवाल्यांना स्वत:च्या भाषेत उत्तर देत होता. सिनेमासृष्टीचा हा संप फोडण्याचं काम त्याने चोख बजावल्याचं राजेश खन्नाचा गट आजही सांगतो. आज सिनेमासृष्टीतल्या तरुणाईच्या आक्रमक गोतावळय़ात त्याला ष्टद्धr(7०)षितुल्य पोझिशन प्राप्त झाली आहे. ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर’ म्हणून त्याची किंमत कित्येकशे कोटींत जाते. मुलाला यशस्वी करण्याचा त्याने चंग बांधलाय. वाट्टेल तशा गेटअपमध्ये, चित्रविचित्र मेकअप करून पडद्यावर दिसलं म्हणजे ती भूमिका अविस्मरणीय ठरत नसते (पाहा ‘झूम बराबर झूम’). याचा त्याला स्वत:लाच विसर पडलाय. ‘दिसण्या-दाखवण्याची चीज’ ज्याला म्हणतात (फिल्मी भाषेत ‘नुमाईश’) अशा पठडीत त्याचं व्यक्तिमत्त्व जाऊन बसलंय. त्याने प्रत्येक वेळेस ‘खाकी’ किंवा शेक्सपियरन व्यक्तिरेखा करावी तर ते शक्य नाही; परंतु नुसताच शोभेचा बाहुला म्हणूनही वावरू नये. पडद्यावर आणि पडद्याबाहेरदेखील.
दुसरी खेळी राजकुमार संतोषीचा ‘खाकी’, बालकिशनचा ‘चिनी कम’ आणि त्यातल्या त्यात बरा असा तिसरा ‘ब्लॅक.’ संजय लीला भन्साळीचा ‘ब्लॅक’ इतका ‘पोझ्ड’ आणि नीटनेटक्या निर्मितीचा आव आणणारा होता की, अमिताभ वगळता इतर जरा ब-यापैकी कलाकारानेदेखील त्यात उत्तम अभिनय केला असता. बाकी सगळा आनंद आहे. ‘राम गोपाल वर्मा की आग’ (म्हणजेच ‘शोले’) हा नीच्चांक मानला, तर कदाचित ‘नि:शब्द’ पाहून वैतागलेल्या मूठभर प्रेक्षकांचं अधिकच डोकं फिरेल. ऋतुपर्णा घोषचा ‘किंग लियर’ उत्तम होता, मात्र तो ब-याचं प्रमाणात विस्कळीत होता. ‘खाकी’, ‘चिनी कम’ उत्तम, बाकी यश चोप्रा आणि करण जोहर कंपनीवालं ‘झूम बराबर झूम’ स्टाईल अराजक. अमिताभ आणि प्रेक्षकांच्याही हाती काहीच न गवसलेलं॥

No comments:

Post a Comment