
शर्वरी जमेनीस
मला अनेक लोक विचारतात की, तू एवढं चांगलं अभिनयाचं करिअर असताना नृत्याला अधिक महत्त्व का देतेस? अशा वेळेस मी त्यांना सांगते की, नृत्य मला भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्याचं एक चांगलं कारण देतं।
मला अनेक लोक विचारतात की, तू एवढं चांगलं अभिनयाचं करिअर असताना नृत्याला अधिक महत्त्व का देतेस? अशा वेळेस मी त्यांना सांगते की, नृत्य मला भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्याचं एक चांगलं कारण देतं. माझी दिल्लीतल्या संगीत नाटक अकादमीच्या बिसमिल्लाह पुरस्कारासाठी निवड झाली. कथ्थक नृत्यातल्या युवा नृत्यांगनांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्याच्या वेळेस दीड तास नृत्य करण्याची संधीही मिळते. त्या वेळी तिकडे दिल्लीत माझ्याविषयी फारच उत्सुकता होती. कारण आतापर्यंत या पुरस्कारावर उत्तरेचं वर्चस्व होतं. कथ्थक हे नृत्य उत्तर हिंदुस्थानी परंपरेतून आपल्याकडे आलेलं आहे. अशा वेळेस ही मुलगी आपलं नृत्य कशा प्रकारे सादर करते, याविषयी सा-यांच्याच मनात एक उत्सुकता होती. मी माझं नृत्य सादर केलं तेव्हा या कार्यक्रमाला गेली अनेक वर्ष हजेरी लावणा-या अनेक ज्येष्ठ कलाकारांनी, रसिकांनी माझ्या नृत्याला तर दाद दिलीच, त्याचबरोबर या पुरस्काराला मी पात्र असल्याचीही पावती मला दिली.
मी शास्त्रीय नृत्य करते, त्यामुळे मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो, त्याला कारणही तसंच आहे. तुम्ही परदेशात जाता, तेव्हा तुमच्या संस्कृतीची त्यांना जाणीव असते. त्यामुळे त्यांना आपलं शास्त्रीय नृत्य पाहायचं असतं. त्याविषयीची त्यांना माहिती असते. उलट भारतात मी कोणतेही कॉपरेरेट कार्यक्रम करते, तेव्हा आयोजकांकडून फ्युजन सादर करण्याचा आग्रह होत असतो. आपल्या शुद्ध शास्त्रीय नृत्याला तेवढी दाद मिळणार नाही, अशी त्यांना भीती वाटत असते. याउलट मी सीएनजी गॅससाठी कथ्थक नृत्यावर आधारित एक कार्यक्रम बसवला होता. त्यात कशा प्रकारे सुरुवातीपासून पर्यावरणाची हानी होत गेली, हे दाखवण्यात आलं होतं. शुद्ध शास्त्रीय नृत्याच्या आधारे हा व्यावसायिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवणं, हे फारच सर्जनशील होतं. ते करताना मला आव्हानात्मक वाटत होतं आणि ते काम करताना मला आनंदच झाला. मला माझ्या नृत्याने कायमच असा आनंद दिला आहे.
नृत्यांगना म्हणून मला एक प्रश्न नेहमीच विचारला जातो तो म्हणजे सरकारकडून या कलांकडे कसं पाहिलं जातं? काही मदत होते का? सरकारकडून काही महोत्सवांचं आयोजन केलं जातं. काही पारितोषिकं दिली जातात. असं असलं तरी सरकारने या कलाकारांसाठी काही कायमस्वरूपी अनुदान दिलं पाहिजे. कारण आपल्या आयुष्याची किमान वीसेक र्वष हा कलाकार या कलेच्या सेवेकरता देत असतो. कोणतीही कला त्याच्या शुद्ध स्वरूपात जतन करण्याचं महत्त्वाचं काम हे कलाकार करत असतात. सरकारी महोत्सवांमध्ये नव्या कलाकारांना लगेच संधी मिळत नाही. कलाकाराच्या मागे ग्लॅमर नसेल तर त्यांना संधीही कमी मिळते. त्यामुळे सुरुवातीला कला शिकण्यासाठी वेळ जातो, त्यानंतर मग संधीसाठी आणि एवढं असतानाही जर कार्यक्रम सतत मिळत गेले तर ठीक, नाही तर काही कलाकारांना आपला चरितार्थ चालवणंही कठीण जात असतं. स्त्रियांच्या बाबतीत परिस्थिती ठीक आहे. मात्र, जे पुरुष कलाकार आहेत, त्याचबरोबर जे साथसोबत करणारे वादक कलावंत आहेत त्यांच्या बाबतीत सरकारने जरूर काही तरी करावं, असं मला वाटतं. अर्थात, सरकारने या कलाकारांचं काम पाहून त्यांना अनुदान दिलं पाहिजे. हे अनुदान योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलं की मला वाटतं, त्याने कला जिवंत राहण्यास मदत होईल.http://www.prahaar.in
No comments:
Post a Comment