Thursday, June 18, 2009

'म्हाडा'ने केले अनेकांना मालामाल

सचिन धानजी

घर खरेदीसाठी पैसे नसणारे लोक म्हाडाला घर परत करण्यापेक्षा ते परस्पर विकून चार पैसे कमवण्याचा मार्ग अवलंबतील अशी शक्यता आहे.

मुंबई- म्हाडाच्या ३८६३ घरांच्या सोडतीनंतर अनेकांचे नशीब फळफळले. नशिबाने साथ दिली, आता पैशाचे काय, असा प्रश्न भाग्यवंतांना पडला आहे. लागलेले घर लाखोंचे असल्याने २५ टक्के रक्कम भरतानाच दमछाक होणार आहे. त्यामुळे फायदा घेऊन लागलेले घर विकण्याचा अनेकांचा विचार आहे. काही हजार रुपये भरून सोडतीत नशीबवान ठरल्याने लाखोंचा फायदा कमवण्याची ही संधीच त्यांना म्हाडाने दिली आहे.

म्हाडाच्या सोडतीनंतर ४ लाख २७ हजार अर्जदारांची निराशा झाली. नंबर लागलेले आणि प्रतीक्षा यादीवर मिळून साधारण ७ हजार ७२६ जण आहेत. पण अल्प उत्पन्न गटातील घरासाठी साडेतीन लाख रुपये आणि उच्च उत्पन्न गटातील मोठे घर ५० लाख रुपयांचे आहे. त्याच्या २५ टक्के रक्कम आणायची कुठून याची चिंता नशीबवान ठरलेल्यांना भेडसावते आहे. बँकेतून फार तर ८० टक्यांपर्यंत कर्ज मिळेल, उरलेल्या २० टक्क्यांसाठी उसनवारी किंवा मग अधिक व्याज मोजून पैसा उभा करण्यास पर्याय नाही. मग म्हाडाला घर परत करण्यापेक्षा ती परस्पर विकून चार पैसेही कमवण्याचा जुनाच मार्ग पुन्हा अनेक जण चालण्याची शक्यता आहे.

कसे विकतात घर?

घर लागले पण पैसे नाहीत, अशा परिस्थितीतील यशस्वी अर्जदाराला गाठले जाते. घर विकण्यासाठी यशस्वी अर्जदार आणि ते घेणा-यामध्ये मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ) तयार होते. मग अर्जदाराला पैसे देऊन त्या पत्राच्या आधारे बँकेतून कर्ज काढून म्हाडात पैसे भरले जातात.

घर यशस्वी अर्जदाराच्याच नावे असते. पाच वर्षानी ते घेणा-यांच्या नावे रीतसर केले जाते. यात आम्ही काहीच करू शकत नाही, कारण ते घर लागले, त्याच्याच नावे असते, असे म्हाडाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

काहीही करा पण एकतरी 'प्रहार' द्या!

, एक प्रहार द्या.., एकतरी द्या हो.., प्रहार संपला, अहो मग म्हाडाचा निकाल कुठे बघायचा, आमचा नंबर आलाय की नाही ते कळणार तरी कसे?, काहीतरी करा हो, एक तरी प्रहार द्या.. म्हाडाने मंगळवारी ३,८६३ भाग्यवंतांची स्वप्नपूर्ती केली आणि बुधवारी सकाळी मुंबई आणि परिसरातील प्रत्येक पेपर स्टॉलवर शब्दश: असे संवाद सुरू होते. आपला नंबर लागलाय की नाही हे जाणून घेण्यासाठी उत्सुक लाखो अर्जदारांना मंगळवारीच प्रहारच्या वेबसाइटने आधार दिला होता. बुधवारी केवळ प्रहारमध्येच हा निकाल छापण्यात आला असल्यामुळे पहाटेपासूनच अंक मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी तर चक्क रांगा लागल्या होत्या. अंकाला प्रचंड मागणी असल्याचे लक्षात आल्यावर त्याचा काळाबाजार सुरू झाला.

दैनिकाच्या अंकाचा काळाबाजार होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. त्यानंतर अनेकांनी परिसरातीलच झेरॉक्स सेंटरवर त्याच्या छायाप्रती पाच-पाच रुपयांना विकत घेतल्या. या छायाप्रती खरेदी करण्यासाठीही एकच गर्दी उसळली होती. मंगळवारी निकाल जाणून घेता न आलेल्या शेकडो अर्जदारांकडून वृत्तपत्र विक्रेत्यांकडे केवळ प्रहारची मागणी होत होती. अवघ्या काही मिनिटांतच प्रहारचे अंक संपल्याने आपल्या मित्रमंडळींना फोन करून जिथून मिळेल तिथून प्रहार विकत घ्या, असे सांगितले जात होते. म्हाडा कार्यालयाच्या शेजारी असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे शिल्लक राहिलेल्या शेवटच्या एकाच अंकाच्या छायाप्रती काढल्या गेल्या. प्रत्येक छायाप्रत पाच ते सात रुपयांना विकली जात होती. त्यामुळे म्हाडा कार्यालयाच्या आसपासच्या झेरॉक्स दुकानांमध्ये बुधवारी प्रहारच्या अंकाच्या छायाप्रती काढण्याचेच काम चालू होते. इतकेच नव्हे तर म्हाडा कार्यालयामध्येही प्रहार अंक तसेच त्याच्या छायाप्रती समोर ठेवून निकालाची माहिती अर्जदारांना दिली जात होती. आझाद मैदान परिसरात प्रहारचे अंक काही मिनिटांत संपल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे होते.

एवढेच काय पोलिस पत्रकार कक्षामधील प्रहारचे अंकही लंपास केले गेल्याने अखेर प्रहारचा अंक नोटीस बोर्डावर लावण्यात आला. अनेक पोलिसांनी या ठिकाणी येऊन निकाल तपासून पाहिला. शीव नाका तसेच सातरस्ता, आर्थर रोड जेल परिसरामध्येही प्रहारची एकच मागणी असल्याने अनेक विक्रेत्यांनी दादपर्यंत जात प्रहार मिळवण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय परिसरातही हीच परिस्थिती होती. मंत्रालयीन कर्मचा-यांनी मोठ्या प्रयत्नांती प्रहारचा एक अंक मिळवत निकाल जाणून घेतला. मंत्रालयात प्रहारचा पत्रकार गेला असता तेथिल अधिका-यांनी प्रहारच्या अंकाची मागणी केली. अंक न मिळाल्याने संकेतस्थळाविषयी विचारणा करून ती माहिती सर्व कर्मचा-यांना सांगण्यात आली.

प्रहारच्या प्रतिनिधींना तर पुणे, सोलापूर, नाशिक, कोकण आदी ठिकाणांहून निकाल जाणून घेण्यासाठी फोन येत होते आणि हे निकाल प्रहारचे प्रतिनिधी तसेच त्यांचे कुटुंबीय प्रत्येकाला सांगत होते.

प्रहारच्या संकेतस्थळावर सकाळीच उर्वरीत चौथ्या टप्प्यातील निकाल टाकण्यात आला होता. येथे हीट्स वाढल्यामुळे दुसरे संकेतस्थळही उपलब्ध करून दिले गेले. त्यामुळे अनेकांना घरबसल्या म्हाडाचा निकाल जाणता आला. स्वत:च्या मालकीच्या घराची हजारोंची स्वप्नपूर्ती झाली की नाही याची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी प्रहारने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल दिवसभर सर्वत्र प्रहारला विशेष धन्यवाद दिले जात होते. हा निकाल प्रहारच्या वेबसाइटवरही उपलब्ध होता. त्यामुळे बुधवारच्या दिवसात या वेबसाइटला १ लाखापेक्षा जास्त हिट्स मिळाल्या.

म्हाडाच्या घरांच्या किमती

शीव प्रतीक्षानगर : अल्प उत्पन्न गट-४ लाख, मध्यम-६ ते ७, उच्च-७ ते ८ लाख.

विक्रोळी कन्नमवार नगर: अल्प-तीन ते साडेतीन लाख, मध्यम-५ ते ६ लाख.

विक्रोळी टागोरनगर: अल्प ३ लाख, मध्यम-५ ते ७ लाख.

दहिसर अशोकवन: मध्यम ८ ते १० लाख रुपये.

दहिसर शैलेंद्रनगर: अत्यल्प-एक ते दीड लाख, अल्प- ३, उच्च-९ ते ११ लाख.

वर्सोवा अंधेरी पश्चिम: उच्च- एकूण रकमेच्या दुप्पट भाव.

गोरेगाव बिंबिसारनगर: मध्यम-९ ते १० लाख, उच्च-१२ ते १४ लाख.

चेंबूर सहकारनगर: अल्प-३ लाख, मध्यम-८ लाख, उच्च-१० ते १२ लाख।


http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment