Thursday, June 18, 2009

पुन्हा तिच धमाल!

निर्मात्यांनी मल्टिप्लेक्सवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आणि सिनेमाप्रेमींनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बहिष्कारकाळात ‘आयपीएल’च्या रंगलेल्या फडामुळे उन्हाळी सुट्टी नीरस वाटली नसली तरी तब्बल दोन महिने हिंदी चित्रपट बघायला न मिळणं हा सहनशक्तीचा अंत होता. आता निर्माते-मल्टिप्लेक्स वाद मिटल्यामुळे अनेक बिगबजेट, महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शनासाठी रांगेत उभे आहेत. इथून पुढच्या प्रत्येक शुक्रवारी ‘मोस्ट अवेटेड’ सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

अग्यात

रामगोपाल वर्माने कितीही भिकार चित्रपट दिले तरी रामू कुठल्याही टप्प्यावर जबरदस्त धक्का देऊ शकतो, यात शंका नाही. म्हणूनच त्याच्या प्रत्येक चित्रपटाविषयी कमालीची उत्कंठा असते. फूंकच्या यशानंतर आता तो आपल्या हॉरर मालिकेतला अग्यात घेऊन येतोय. जंगलनंतर रामू पुन्हा एकदा अग्यातच्या निमित्ताने जंगलात जातोय. श्रीलंकेतल्या जंगलात चित्रित झालेल्या अग्यातमध्ये स्पेशल इफेक्ट्सही भरपूर आहेत. रामूच्या म्हणण्यानुसार, यात भीतीचा पैलू तर आहेच, शिवाय आत्यंतिक अशा अनामिक आणि अनपेक्षित भीतीमुळे उद्भवणारी मानसिक गुंतागुंतही यात दाखवण्यात आली आहे. असे चित्रपट म्हणजे तांत्रिक करामती करायला भरपूर वाव. तंत्रावर रामूची हुकूमत आहेच, पण पटकथेवर लक्ष केंद्रित करून प्रेक्षकांच्या मनात खरोखर भीतीची भावना जागृत करण्यात तो यशस्वी होतो का ते बघायचे.प्रदर्शनाची तारीख : २४ जुलै

जश्न

भट्ट कॅम्पचा हा आणखी एक स्मॉल बजेट चित्रपट. स्टारमंडळींच्या वाटेला न जाता नव्या दमाच्या चांगल्या अभिनेत्यांना घेऊन, कंटेंटवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत नवीन विषयावरचा सिनेमा करायचा हा भट्टबंधूंचा फॉर्म्युला गेल्या काही वर्षात चांगलाच यशस्वी झालाय. दिग्दर्शकाच्या खुर्चीत कधी अनुराग बसू असतो, तर कधी मोहित सुरी. पण चित्रपटावर भट्ट कॅम्पचा ठसा स्पष्ट असतो. शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन, अंजना सुखानी, शाहना गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट म्युझिकल आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अ‍ॅसिड टेस्ट ठरावा. प्रदर्शनाची तारीख : १७ जुलै

कम्बख्त इश्क

निर्माता साजिद नाडियादवालाचा हा सिनेमा मुहुर्तापासूनच चर्चेत आहे. पण गंमत म्हणजे अक्षय कुमार एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत असताना याचा मुहूर्त होऊनही तो चर्चेत आहे, तो मात्र सिल्व्हेस्टर स्टॅलॉन आणि आरनॉल्ड श्वात्झनेगर यांसारख्या हॉलिवूडच्या स्टारमुळे. अक्षय कुमार आणि करीना कपूरसारखी हिट जोडी, हॉलिवूडमधलं शूटिंग आणि अक्षयचे डेअरडेव्हिल स्टंट्स आणि कोटय़वधींची उधळण यामुळे चित्रपटाला जबरदस्त क्युरिऑसिटी व्हॅल्यू आहे. निर्मात्याने साबिर खानसारख्या उदयोन्मुख दिग्दर्शकावर खेळलेला कोटय़वधींचा जुगार यशस्वी होतो का ते प्रदर्शनानंतरच कळेल.प्रदर्शनाची तारीख : ३ जुलै

शॉर्टकट

गांधी, माय फादर या ऑफबिट चित्रपटानंतरची अनिल कपूरची ही दुसरी निर्मिती, मात्र पुरेपूर व्यावसायिक आहे. गांधी, माय फादर हा गंभीर चित्रपट होता; तर शॉर्टकट हा विनोदी, १०० टक्के मनोरंजक. फिरोज खानसारख्या रंगभूमीवरील दिग्गज दिग्दर्शकाला चित्रपट बनवण्याची संधी दिल्यानंतर अनिलने शॉर्टकटसारख्या व्यावसायिक चित्रपटासाठी नीरज व्होरासारखा (हेराफेरीचा लेखक, फिर हेराफेरीचा दिग्दर्शक) व्यावसायिक दिग्दर्शकच निवडला. त्यामुळे चित्रपटात तर्काला वगैरे फारसा वाव नसून डेव्हिड धवन किंवा प्रियदर्शनच्या चित्रपटांप्रमाणे डोकं बाजूला ठेवून एन्जॉय करायची ही कॉमेडी असणार हे उघड आहे. अक्षय खन्ना, अमृता राव आणि अर्शद वारसी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. प्रदर्शनाची तारीख : १० जुलै

http://www.prahaar.in

No comments:

Post a Comment