
चैताली भोगले
एसएससी बोर्डाच्या जोडीने इतर अभ्यासक्रमाचे पर्यायही आता सरसकट सर्व पालकांना खुणावू लागले आहेत। मात्र ही निवड फक्त ‘स्टेटस सिंम्बॉल’ किंवा ‘मार्काची सोय’ म्हणून केली जाऊ नये.
आपल्या पाल्याला सगळ्यात चांगलं शिक्षण मिळावं, सर्वोत्तम करियर त्याला निर्धोकपणे घडवता यावं यासाठी सगळ्या बाजूंनी दक्ष असणारे पालक उपलब्ध पर्यायांच्या निवडीबाबत नेहमीच दुविधेत अडकलेले दिसतात. कधी हा प्रश्न मुलांसाठी योग्य माध्यम निवडण्याचा असतो तर कधी अभ्यासाव्यतिरिक्त अधिकचं काय त्यांना देता येईल, याबद्दल पर्यायांची चाचपणी करणं सुरू असतं. या सगळ्या दुविधांमध्ये एका नव्या संभ्रमाची भर गेल्या काही वर्षामध्ये पालकांच्या मनामध्ये पडली आहे. विशेषत: शहरी, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांपुरता मर्यादित असलेला हा प्रश्न हळुहळू सगळ्याच स्तरांमध्ये झिरपत चालल आहे आणि तो म्हणजे आपल्या पाल्यासाठी योग्य बोर्डाची निवड. आपल्या पाल्यांना नव्याने शाळेमध्ये घालताना आज शहरी पालक या दोन्ही पर्यायांचा विचार करू लागले आहेत.
केंद्र सरकारच्या चाकरीत असणा-या आणि बदल्यांच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत राहणा-यासाठी केंद्रीय विद्यालयांसारख्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ अर्थात ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम राबवणा-या शाळा, बाहेरगावी, परदेशी जाऊ शकणा-या पालकांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अभ्यासाशी जुळवून घेणं शक्य व्हावं, या हेतूने ‘इंडियन काऊन्सिल फॉर सेकंडरी एज्युकेशन’ अर्थात ‘आयसीएसई’चा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अभ्यासपद्धतीशी सुसंगत असा अभ्यासक्रम राबवणा-या शाळा आणि बाकी सरसकट विद्यार्थ्यांसाठी त्या त्या राज्यांच्या बोर्डाच्या शाळांचे अभ्यासक्रम अशी सुस्पष्ट विभागणी होती. पण आता‘आयसीएसई’ ‘आयजीसीएसई’, ‘आयबी’ बोर्डासारखे वेगळे पर्याय सरसकट सगळ्या पालकांना खुणावू लागले आहेत. बदलता आर्थिक स्तर, जागतिक पातळीवरच्या शिक्षणपद्धतींबद्दलचं ज्ञान, केवळ शिक्षणाच्या दर्जाच्या जोडीनेच उत्तमात उत्तम सुविधा पुरवणा-या शाळा निवडण्याकडे वाढणारा कल अशी अनेक कारणं या बदलत्या मनोवृत्तीच्या मुळाशी आहेत.
केंद्राच्या अखत्यारितल्या बोर्डाचा अभ्यासक्रम तुलनेने अधिक कठीण आणि गुणदान पद्धतीही अधिक किचकट असल्याचं चित्र एकेकाळी होतं. गेल्या काही वर्षामध्ये ही परिस्थिती बदलली आणि या विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांमध्ये घसघशीत वाढ झाली. या वस्तुस्थितीचं आकर्षणही पालकवर्गाला आहेच, पण त्याखेरीज या अभ्यासक्रमांचं नेमकं वेगळेपण काय आहे, याबद्दलही पालकांनी चौकस असण्याची गरज आहे. आपल्या मुलासाठी ‘आयसीएसई’ शाळेची निवड करणाच्या निर्णयावर गांभीर्याने विचार करणारा पालकवर्ग खरोखरीच प्रत्येक बोर्डाच्या चांगल्या-वाईट बाबींवर विचार करतच असतो. ‘एसएससी’ बोर्डाच्या तुलनेत इथल्या अभ्यासक्रमात नुसत्या घोकंपट्टीऐवजी ज्ञानाच्या व्यवहारातल्या वापरावर, ‘अॅप्लिकेशन ऑफ नॉलेज’वर जास्त भर असणं ही बाब या वर्गाला महत्त्वाची वाटते. पण पालकांच्या मागणीनुसार ‘आयसीएसई’सारखं बोर्ड नव्याने लागू करणा-या मुंबईतल्या काही जुन्या नामांकीत शाळा अजून परीक्षा आणि मार्काच्या मानसिकतेतून पुरत्या बाहेर आलेल्या नाहीत अशा तक्रारही ऐकू येत आहेत. म्हणजे अजूनही मूल्यमापनासाठी प्रोजेक्ट्स, वर्कशीट्स, सरप्राइझ टेस्ट्स यांच्यावर भर दिला जाण्याऐवजी कुठे तरी मार्काचा आधार घेतला जातोच आणि मार्कामुळे मुलामुलांमध्ये वाढणारी स्पर्धा टाळली जात नाहीच, असं त्यांचं म्हणणं आहे. या अभ्यासक्रमामध्ये स्थानिक इतिहास-भूगोलासारखे विषय अंतर्भूत केले जात नाहीत, ही बाबही अनेक जणांना खटकणारी वाटते. यात शिक्षणाला वस्तू म्हणून विकणा-यांची भाऊगर्दीही वाढते आहेच. अशा संस्थांमध्ये अभ्यासक्रम वेगळा असला तरीही तो योग्य प्रकारे राबवला जातोय का? की फक्त बाह्यसुविधांवर, समारंभ सोहळ्यांवरच जास्त भर दिला जातो आहे, शाळेचं वातावरण, संस्कृती, इतिहास काय आहे, शाळांकडून राबवल्या जाणाऱ्या नवनव्या प्रयोगांसाठी पालकांकडून गृहीत धरल्या जाणाऱ्या खर्चातून खरोखरच कोणत्या गोष्टी साध्य होत आहेत, हेही सजगपणे तपासून पाहायला हवं.
अभ्यासक्रम कोणताही असला तरीही त्यातून तुमचं मूल किती हुशार बनतंय, ज्ञानाचा व्यवहारातला वापर किती सक्षमतेने करतंय, या गोष्टी पाल्याच्या वैयक्तिक क्षमतेवर, शिक्षकांच्या प्रयोगशीलतेवर, उपलब्ध साधनसामग्रीवर, पालकांच्या सहभागावरही ब-याच अंशी अवलंबून असतात आणि या गोष्टी कोण्या एका बोर्डाची मक्तेदारी नक्कीच नाही. त्यामुळे केवळ क्रेझ म्हणून नव्या पर्यायांची निवड डोळे झाकून करायची की पाल्याच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टीने निर्णय घ्यायचा, हे प्रत्येकाचं प्रत्येकाने ठरवायचं आहे. अर्थात, शेवटी मुलांसाठी चांगल्या करियरची व्याख्या बनवण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे सगळं ‘अॅप्लिकेशन ऑफ नॉलेज’ मागे पडतं. अधिकाधिक गुण मिळवून अधिकाधिक चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची चढाओढच वरचढ ठरते. असं होऊ नये. मुलांच्या शिक्षणासाठी नव्या पर्यायांची निवड करताना पालकांनी ही परीक्षा केवळ मार्क आणि टक्केवारीच्या निकषावर देऊन मोकळं होऊ नये. पालकांनी समंजस विचार करावारजनी करंदीकर, पालक समुपदेशक
शाळांमधून पालकांना सतावणा-या समस्यांबद्दल आमचं बोलणं होतं तेव्हा त्यात बोर्डाच्या निवडीवरून थेट चर्चा होत नसली तरीही या विषयावरून वाढत चाललेला गोंधळ आम्हाला नक्कीच जाणवत आहे. मुलांचं इंग्रजी सुधारावं, त्यांना मिळवलेल्या माहितीचा व्यवहारात उपयोग कसा करावा, याची माहिती मिळावी इत्यादी कारणांसाठी ‘आयसीएसई’, ‘आयजीसीएसई’, ‘आयबी’ बोर्डासारख्या शाळा निवडण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. त्यात काही चूक आहे, असं सरसकट म्हणणं योग्य ठरणार नाही. पण एखाद्या शाळेमधून पालकांचा गटच्या गट आपल्या मुलांना केंद्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये टाकण्याचा निर्णय घेताना दिसतो तेव्हा यात सारासार विचार किती आहे आणि ‘स्टेटस सिंबल’ म्हणून या सगळ्याकडे किती पाहिलं जातं, हा प्रश्न पडतो. त्यातून ‘एसएससी’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एक न्यूनगंड वाढीस लागताना दिसतो. ही मनोवस्था मग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. अशा पालकांना समुपदेशन करताना त्यांच्या मनातला हा न्यूनगंड काढून टाकण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रत्येक बोर्डाच्या काही चांगल्या बाबी आहेत, तर काही तोटेही आहेत. त्यातला आपल्या पाल्याला पेलवू शकेल, असा अभ्यासक्रम कोणता? गर्दी जिथे चालली आहे, तिथे डोळे झाकून जाण्याऐवजी जिथे आहोत, तिथेच राहून मुलांनी अधिकाधिक चांगल्या कोणत्या गोष्टी देता येतील? याचा अधिक दूरगामी आणि विवेकनिष्ठ विचार पालकांकडून झाला तर आजच्याइतकं निकालांचं दडपण त्यांना जाणवणार नाही. एसएससी बोर्डामध्येही सकारात्मक बदल होत आहेत सुचेता भवाळकर मुख्याध्यापक, ‘आयईएस’चे व्ही. एन. सुळे गुरुजी विद्यालय. बोर्ड ऑफ स्टडीज्ची सदस्य म्हणून ‘राज्य शिक्षण महामंडळा’चं कामकाज गेली दोन र्वष मी फार जवळून पाहत आहे. संख्येने ब-याच मोठ्या आणि राज्याच्या विविध भागांत, आर्थिक, सामाजिक स्तरांमध्ये विखुरलेल्या विद्यार्थीवर्गासाठी या महामंडळाच्या अभ्यासक्रमाची आखणी केली गेली आहे. त्यात फार वेगाने आणि फार मोठ बदल घडवून आणणं तांत्रिकदृष्या कठीण आहे. तरीही तो अधिकाधिक अद्ययावत बनवण्याच्या दृष्टीने चाललेले प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत. हा अभ्यासक्रम बदलांना पुरक नाही, त्यात लवचिकता नाही, असे आरोप करत केंद्रीय बोर्डाना झुकतं माप देण्याकडे जी मनोवृत्ती वाढते आहे, पण अशा प्रकारची तुलना नेहमीच होत आली आहे. अगदी एकाच बोर्डातर्गतही केवळ अधिक गुण देणारे म्हणून संस्कृतसारख्या विषयांची निवड करणारेही आहेतच. आज पाल्यासाठी ‘आयसीएससीई’, ‘आयजीसीएसई’ बोर्डाची निवड करणारे पालकही मुलांच्या सर्वागिण विकासापेक्षा मार्काचाच विचार अधिक करताना दिसतात. नाही तर या बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची पातळी गाठणं इथेही शक्य आहेच. विद्यार्थ्यांची ज्ञानाची पातळी समान हवी!मंजुषा लोकेगावकर पालक प्रतिनिधी
मी माझ्या मुलासाठी निवडलेल्या ‘सीबीएसई’ बोर्डाचा अभ्यासक्रम ब-यापैकी सखोल आहे. त्यात लिखाणापेक्षा आकलनावर जास्त भर आहे. अनेक संकल्पना सुटसुटीत पद्धतीने समजावून सांगितल्या जात आहेत. खूप मोठा विद्यार्थीवर्ग नसल्याने प्रयोगशीलतेला अर्थातच जास्त वाव आहे. वर्गामध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने शिक्षक प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊ शकतात, या गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत. अशा कारणांमुळे पालक या शाळांना झुकतं माप देऊ लागले तर त्यात नवल नाही. ‘एसएससी’ बोर्डाने या मुद्दय़ांचा विचार जरूर करावा. इतर अभ्यासक्रमांमधल्या चांगल्या गोष्टी या अभ्यासक्रमात नक्की अंतर्भूत करता येतील. त्यातून मग प्रत्येक बोर्डाच्या विद्यार्थ्यांची ज्ञानाची पातळी, गुणांची पातळी सारखी असेल. सामाजिक दरी वाढते आहेअरुंधती चव्हाण अध्यक्ष, विद्यार्थी पालक संघटना
गुणदान पद्धतीतल्या फरकामुळे केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणारे मुबलक गुण आणि त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळी त्यांना होणारा फायदा या गोष्टींमुळे ‘एसएससी’च्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आहे हे खरं आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यामधली आपल्या हक्कांबद्दलची जाणीव वाढते आहे, हेही खरं आहे. केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमांच्या वेगळेपणाबद्दल सांगायचं तर त्यांच्याकडे इयत्ता नववीमधला अभ्यासक्रम दहावीमध्ये पुढे चालू राहतो. आपल्या राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमात तो पूर्णपणे वेगळा असतो. त्या बोर्डामध्ये व्याकरणाचा अभ्यास तुलनेने खूपच सुटसुटीत असतो. ते फारसं काटेकोरपणे तपासलंही जात नाही. पण अशा फरकांमुळे ‘एसएससी’ बोर्ड निकृष्ट दर्जाचं ठरतं असं होत नाही. या पद्धतीत सुधारणेला बराच वाव आहे, हे मान्य करायलाच हवं. उदाहरणार्थ, शिक्षणाच्या दर्जावर कुठे तरी राज्य शासनाचं नियंत्रण असायला हवं. पण दोन प्रकारच्या बोर्डामधला फरक जोखताना पालक या गोष्टींऐवजी सोयी-सुविधाकडे जास्त लक्ष देताना दिसतात. ही मनोवृत्ती खटकणारी आहे. त्यातूून तयार होणाऱ्या सामाजिक दरीचे परिणाम आपण पाहातच आहोत. अकरावी प्रवेशाच्या मुद्यावरून न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवादामध्ये केंद्रीय बोर्डाची तरफदारी करणा-या पालकांची भाषा ‘एसएससी’ बोर्डाला तुच्छ लेखणारी होती. हीच मनोवृत्ती महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांमध्येही दिसून येते. नेमकी हीच बाब चिंताजनक आहे।http://www.prahaar.in
No comments:
Post a Comment